कोरेगावातही ‘किसन वीर’चे युनिट

By admin | Published: September 28, 2015 09:57 PM2015-09-28T21:57:02+5:302015-09-28T23:43:02+5:30

४४ वी वार्षिक सभा : डिसेंबरमध्ये खंडाळा कारखान्याचा गळीत सुरू

Kisan Veer's unit in Koregaon too | कोरेगावातही ‘किसन वीर’चे युनिट

कोरेगावातही ‘किसन वीर’चे युनिट

Next

भुर्इंज : किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत डिसेंबर २०१५ मध्ये खंडाळा कारखान्याचे गळित सुरू झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यात कारखान्याचे युनिट सुरू करण्यासाठीचा ठराव सभासदांकडून मंजूर करण्यात आला.
भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कारखान्याची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत विषय पत्रिकेवरील एक ते बारा विषय मंजूर झाले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे, स्वातंत्रसैनिक जंगम गुरूजी, जयसिंगराव फरांदे, शंकरराव पवार, प्रल्हाद चव्हाण, बाबासाहेब कदम, नंदाभाऊ जाधव, जिजाबा पवार, चंद्रकांत चव्हाण, चंद्रकांत ढमाळ आदी उपस्थित होते.
सभेचे व कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी शेतकरी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. तीन कारखान्यांची धुरा सांभाळत असताना कोरेगाव तालुक्यातील सभासदांच्या आग्रहास्तव चौथे युनिट सुरू करण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात येईल. पुढील वर्षी तो प्रकल्प मार्गी लागेल, अशी ग्वाही दिली.
अध्यक्ष भोसले म्हणाले, साखरेचे उत्पादन अतिरिक्त झाले आहे. त्यामुळे बाजारात साखरेचे दर कमी झाले आहेत. एक हजार रुपयांची तूट कारखान्यास सोसावी लागत आहे. सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून एफआरपीप्रमाणे दर देऊन बांधिलकी जोपासली आहे.
प्रारंभी अहवालवाचन प्रभारी कार्यकारी संचालक एन.बी. पाटील यांनी केले. संचालक नंदकुमार निकम यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी आभार मानले. (वार्ताहर)

गुणवत्ता वाढणार
किसन वीर कारखाना यापुढे ऊस तोडणीचा कार्यक्रम राबवताना नोंदणी तारीख विचारात न घेता उसाचा उतारा मीटरच्या साह्याने तपासून प्राधान्यक्रम देऊन कार्यक्रम राबवणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांच्या बरोबरच कारखान्याची गुणवत्ता वाढेल, असा आशावाद मदन भोसले यांनी व्यक्त केला. सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

Web Title: Kisan Veer's unit in Koregaon too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.