कऱ्हाड-विटा रस्त्यावर गुडघाभर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:37+5:302021-06-19T04:25:37+5:30
ओगलेवाडी : कऱ्हाड-विटा रस्त्यावर कॅनाॅल चौकापासून ते जेके पेट्रोल पंपापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. सध्या यातून लहान वाहने ...
ओगलेवाडी : कऱ्हाड-विटा रस्त्यावर कॅनाॅल चौकापासून ते जेके पेट्रोल पंपापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी साठले आहे. सध्या यातून लहान वाहने चालवता येत नाहीत तर परिसरातील घरात पाणी शिरले आहे. दुकानातही पाणी शिरू लागले आहे. लाॅकडाऊनमुळे अगोदरच दुकाने बंद होती. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पाण्यामुळे दुहेरी फटका बसणार आहे. संपूर्ण पावसाळ्यात काय करायचे याची चिंता सर्वांना सतावत आहे.
अनेकांनी आंदोलन केले. अनेकांनी अर्ज विनंत्या केल्या. लोकप्रतिनिधी यांनी पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु काहीच उपयोग झाला नाही. हे पाणी बाहेर काढण्यात अनेक अडचणी आहेत. त्या सोडवणे कठीण असल्याने पाणी बाहेर काढणेही शक्य झाले नाही. ग्रामपंचायतीचे आणि तालुका प्रशासनाने अनेक उपाययोजना करून पाहिल्या, मात्र त्या अपुऱ्या ठरत आहेत. पावसाचे येणारे पाणी आणि निचरा होऊन जाणारे पाणी यांचे प्रमाण व्यस्त आहे. जोपर्यंत हे प्रमाण सम होणार नाही तोपर्यंत हा त्रास कमी होणार नाही. त्यासाठी मोठा नाला काढून हे पाणी बाहेर काढून देण्याचे काम सुरु झाले होते. मात्र अडचणी आल्याने मागील काही दिवसांत ते बंद असल्याचे दिसून येते आहे.
याचा फटका येथील रहिवासी लोकांना होतो.
पाणी वाढले की साप, विंचू यांसारखे प्राणी घरात घुसतात. त्यामुळे यांना रात्रभर जागे राहावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा लहान मोठी दुकाने आहेत. या दुकानांत पाणी शिरून नुकसान होते. यामुळे दर वर्षी या दुकानदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते आहे. भरपाई मिळत नाही मात्र त्रास नेहमीच सोसावा लागतो. प्रशासनाने आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावेत आणि तेही लवकरच करावेत, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. फक्त आश्वासन नको तर ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे.