निसराळेत दोन सख्ख्या भावांवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:38 AM2021-05-10T04:38:34+5:302021-05-10T04:38:34+5:30
नागठाणे : जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांवर चाकूसारख्या हत्याराने वार केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना निसराळे (ता. ...
नागठाणे : जमिनीच्या वादातून दोन सख्ख्या भावांवर चाकूसारख्या हत्याराने वार केल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना निसराळे (ता. सातारा) येथे शनिवारी सायंकाळी घडली.
सचिन साहेबराव घोरपडे व सोमनाथ साहेबराव घोरपडे अशी या चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भावांची नावे आहेत. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निसराळे येथील सचिन साहेबराव घोरपडे, सोमनाथ साहेबराव घोरपडे व त्यांचा संशयित चुलतभाऊ यांच्यात जमिनीच्या कारणावरून आधी वाद होता. याच वादातून संशयित चुलतभावाने शनिवारी सकाळी सचिन घोरपडे व सोमनाथ घोरपडे यांच्याविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
शनिवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास सचिन घोरपडे व सोमनाथ घोरपडे हे बंधू चौकशीसाठी निसराळे गावातील मुख्य रस्त्याने बोरगाव पोलीस स्टेशनकडे निघाले असतानाच संशयित चुलतभाऊ, त्याचा सातारा येथील भाचा व भाच्याचे तीन ते चार साथीदारांनी त्यांना अडवून त्यांच्याशी भांडू लागले. यावेळी त्यांच्यातील वाद विकोपाला जात असल्याचे पाहून गावातील काही ग्रामस्थांनी याची माहिती बोरगाव पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्कष डॉ. सागर वाघ तत्काळ कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळाकडे रवानाही झाले.
त्यावेळी वाद विकोपाला जाऊन संशयितांनी दोन्ही भावांवर चाकूसारख्या धारदार हत्याराने पोटात, छातीवर व पाठीवर वार करून लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर हल्लेखोर पळून जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून हल्लेखोरांपैकी दोघांना जेरबंद केले. तर अन्य संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी तातडीने जखमी झालेल्या दोन्ही भावांना उपचारासाठी सातारा येथे पाठविले.
यावेळी घटनास्थळावरून पोलिसांनी हल्लेखोरांनी वापरलेली एक स्कॉर्पिओ (एमएच ०४ बीएम ८८२१) व दुचाकी ताब्यात घेतली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देत तपासकामी सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत या घटनेची फिर्याद दाखल करण्याचे काम बोरगाव पोलीस ठाण्यात सुरू होते.