पाण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार
By admin | Published: December 14, 2015 09:21 PM2015-12-14T21:21:01+5:302015-12-15T00:56:56+5:30
शेतकरी संतप्त : अकाईचीवाडीत वीजपंप बंद केल्याने पिके वाळली
उंडाळे : अकाईचीवाडी, ता. कऱ्हाड येथील पिण्याच्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाझर तलाव व तलावानजिकच्या सर्वच खासगी विहिरींवरील शेती पंप बंद केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पाण्याअभावी ऊस वाळू लागल्याने खासगी विहिरींवरील शेतकऱ्यांनी एक किंंवा दोन पाण्यासाठी वीज शेतीपंप सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा वापर काटकसरीने करावा व पाझर तलावातील बेकायदेशीर पाणी उपसा बंद करण्याबाबत अकाईचीवाडी ग्रामपंचायतीला सूचना केल्या आहेत. या सूचनेतून पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने ठराव करून पाझर तलाव व नजिकच्या खासगी विहिरीतील शेतीपंप तातडीने बंद करण्याबाबत वरिष्ठ कार्यालय, तहसीलदारांना कळविले होते. तहसीलदारांनी तलावातील व तलावानजिकच्या गाव विहिरी वगळता सर्व वीज, शेतीपंप बंद करण्याचा आदेश वीजवितरण कंपनीला दिला. त्यानुसार तलावाजवळील सर्व शेतीपंप बंद करण्यात आले. त्यामुळे हातातोंडाला आलेले उसाचे पीक वाळू लागल्याने शेतकऱ्यांनी तहसीलदारांना विनंती करून एक किंंवा दोन पाणी देण्यासाठी फक्त तलावानजिकच्या खासगी विहिरींवरील शेतीपंप सुरू करण्याची विनंती केली. पाणी टंचाई लक्षात घेता सर्वच शेतकऱ्यांनी उसाचा खोडवा न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. मात्र, ग्रामपंचायत, तहसीलदार व वीजवितरण कंपनीच्या आडमूठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा ऊस वाळू लागला आहे. ऊसतोडी मिळण्यासाठी आणखी दोन महिने लागणार असल्याने अनेक कारणांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.तरी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
माझ्या मालकीच्या खासगी विहिरीवर दोन एकर ऊस असून, माझी विहिर तलावापासून २०० फुटावर आहे, तर गाव विहिरीपासून दोन हजार फुटावर आहे. असे असताना वीजपंप बंद केल्याने माझा संपूर्ण ऊस वाळला आहे. उसाला एक किंवा दोन वेळा पाणी मिळाले असते तर माझे हे नुकसान टळले असते.
- लालासाहेब वडकर,
शेतकरी