माणसाला नोटा मोजण्याएवढे ज्ञानही पुरेसे :
By admin | Published: July 4, 2016 09:46 PM2016-07-04T21:46:25+5:302016-07-05T00:29:32+5:30
दातार-- व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि व्यवसायात यशस्वी कसे व्हावे, याविषयी मनमोकळया गप्पा मारल्या.
कऱ्हाड : ‘जीवनात आणि उद्योगात यशस्वी होण्यासाठी खूप ज्ञानाची नाही तर चिकाटी, जिद्द व अपार मेहनतीची आवश्यकता आहे. ज्ञान कमी असले, अगदी नोटा मोजण्याइतपत असले तरी चालेल,’ असे मत अलअदिल उद्योग समूहाचे प्रमुख तथा मसालाकिंंग डॉ. धनंजय दातार यांनी व्यक्त केले.येथील रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, संगम व रोटरॅक्ट क्लब यांच्या संयुक्त पदग्रहण समारंभात ते बोलत होते. यावेळी असिस्टंट गव्हर्नर झोन ५ संदीप सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत मंजिरी ढवळे यांनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी आणि व्यवसायात यशस्वी कसे व्हावे, याविषयी मनमोकळया गप्पा मारल्या. दुबईस्थित उद्योगपती असलेले डॉ. दातार हे कऱ्हाडचे जावई असल्याचे आणि त्यांची पत्नी वंदना दातार या कृष्णा हॉस्पिटलमध्ये नोकरी करीत होत्या व मुलाचा जन्मही याच हॉस्पिटलमध्ये झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आजारावर औषधोपचार सुद्धा कऱ्हाडच्या नचिकेत वाचासुंदर यांचा घेत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पार पडला.
रोटरी क्लब आॅफ कऱ्हाडचे नूतन अध्यक्ष राहुल कुलकर्णी व सचिव अभय नांगरे यांनी अनघा बर्डे व वैभव कांबळे यांच्याकडून इनरव्हील क्लबचे नूतन अध्यक्षा शैलजा कापसे व सचिव सुजाता बेंद्रे यांनी पदभार स्वीकारला. तर इनरव्हील क्लब संगमचे नूतन अध्यक्ष म्हणून नयन पाटील व सचिव म्हणून वृषाली पाटणकर यांनी तर रोटरॅक्ट क्लब प्रीतिसंगमचे अध्यक्ष म्हणून कुमार संघवी व सचिव म्हणून रेणुका जाधव यांनी मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून पदभार स्वीकारला. तर रोटरी क्लबच्या मानद सदस्यपदी शेखर चरेगावकर, डॉ. मोहन राजमाने व विनायक औंधकर यांची निवड करण्यात आली. संदीप सुतार यांनी संस्थेचे कार्य कसे चालते, याची माहिती दिली.
या कार्यक्रमाला जयराम सचदेव, सुहास पवार, कमलाकर पाटील, अनिल सावंत, तुषार गद्रे, अभिजित चाफेकर, क्षितीज धुमाळ, चंद्रशेखर पाटील, जगदीश वाघ यांच्यासह कऱ्हाड तालुक्यातील सर्व रोटरियन उपस्थित होते. यावेळी दातार
दाम्पत्य यांना रोटरी क्लबच्या वतीने सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रो. अभय नांगरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)