नवदाम्पत्याच्या मृत्यूनंतर सुचले शहाणपण!

By admin | Published: November 3, 2014 10:08 PM2014-11-03T22:08:00+5:302014-11-03T23:25:12+5:30

खड्ड्यात पडलं डांबर : विजयनगरमध्ये रस्त्याची तत्काळ दुरुस्ती, अपघातस्थळी सकाळीच कर्मचारी दाखल

Knowledgeable wisdom after the death of the bidder! | नवदाम्पत्याच्या मृत्यूनंतर सुचले शहाणपण!

नवदाम्पत्याच्या मृत्यूनंतर सुचले शहाणपण!

Next

कऱ्हाड : दुर्घटना घडू नये म्हणून उपाययोजना करण्याऐवजी दुर्घटना घडून गेल्यानंतर दुरुस्ती करण्यात काही शासकीय कार्यालये धन्यता मानतात. बांधकाम विभागानेही याचाच कित्ता गिरवलाय. कऱ्हाड-पाटण मार्गावर विजयनगर येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे यापूर्वी अनेक अपघात झाले; पण त्याकडे लक्ष द्यायला, उपाययोजना करायला बांधकाम विभागाला वेळ नव्हता. अखेर या खड्ड्यांनी नवदाम्पत्याचा बळी घेतल्यानंतर बांधकामच्या अधिकाऱ्यांना जाग आली. रविवारच्या अपघातानंतर सोमवारी सकाळीच बांधकाम विभागाकडून ते धोकादायक खड्डे मुजविण्यात आले.
पाटणहून कऱ्हाडला येताना विजयनगरपासून वीज कार्यालय बसथांब्यापर्यंत तीव्र उतार आहे. तसेच रस्त्याला वळण नसल्याने पाटणहून येणारी वाहने या उतारावरून भरधाव येतात. पूर्वी वीज कार्यालय थांब्यानजीक टोलनाका होता. तेथे वाहने थांबावीत, यासाठी गतिरोधक तयार करण्यात आले होते. तसेच टोलनाक्यावरील दिव्यामुळे रात्रीही त्या ठिकाणी अडथळा असल्याची जाणीव वाहनचालकांना होत होती. उतारावर टोलनाका असूनही अडथळ्यांमुळे चालकाकडून वाहन नियंत्रित केले जायचे. गतवर्षी विजयनगरचा टोलनाका बंद करण्यात आला. मात्र, टोलनाक्याचा साचा व गतिरोधक त्याच स्थितीत होते. रात्री टोलनाक्याच्या साच्यामध्ये विजेची सोय करण्यात आली नसल्याने रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या या साच्याला व दुभाजकाला वाहने धडकून अपघात व्हायचे. अपघातांची संख्या वाढल्यानंतर टोलनाक्याचा साचा हटविण्यात आला. तसेच गतिरोधकही काढण्यात आले. मात्र, हे करताना रस्त्याच्या मधोमध व गतिरोधक काढलेल्या ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे तेथे मोठमोठे दगड ठेवण्यात आले. वास्तविक, ही खबरदारीची उपाययोजना होती; पण ती वाहनचालकांच्या जिवावर बेतू लागली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना अंधारात दगड न दिसल्याने अनेक वाहने त्यावर आदळली. सप्टेंबरच्या अखेरीस या दगडांमुळे अनेक अपघात झाले. त्यानंतर रस्त्याच्या मधोमध असलेले ते दगड हटवून खड्ड्यात खडी टाकण्यात आली. मात्र, काही दिवसांतच ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी परिस्थिती झाली. खडी उखडून पुन्हा खड्डे पडले.
विजयनगरपासून टोलनाक्याच्या ठिकाणापर्यंत रस्त्याला तीव्र उतार असल्याने भरधाव येणारी वाहने त्या खड्ड्यात आदळण्याची मालिका गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षाची शिक्षा मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील नवदाम्पत्याला भोगावी लागली. संबंधित खड्ड्यात आदळल्यानंतर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटून कंटेनरने प्रदीप व उषा पाटील या नवदाम्पत्याला चिरडले. खड्डे वेळेत मुजविले गेले असते तर कदाचित अपघात झालाच नसता. देवदर्शनाला निघालेल्या नवदाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला नसता. (प्रतिनिधी)
डांबराचे पॅचवर्क
अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळीच कऱ्हाड-पाटण मार्गावरील विजयनगर येथील खड्डे मुजविण्याची कार्यवाही सुरू केली. सकाळी दहा वाजताच बांधकामचे कर्मचारी खडी व डांबरासह त्याठिकाणी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी खड्ड्यांच्या परिसराची स्वच्छता करून अगोदर खड्डे खडीने भरून घेतले. त्यानंतर त्यावर डांबराचे पॅचवर्क करण्यात आले. दुपारपर्यंत हे काम सुरू होते. कऱ्हाडनजकीच्या वारुंजी फाट्यापासून पाटणपर्यंतचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग पाटण कार्यालयाच्या अखत्यारीत येतो. विजयनगर येथे सोमवारी करण्यात आलेली रस्त्याची दुरूस्तीही पाटण कार्यालयाकडून करण्यात आल्याचे सांगितले जाते.

Web Title: Knowledgeable wisdom after the death of the bidder!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.