कोवळं बालपण अडकतंय कायद्याच्या कचाट्यात !

By admin | Published: December 25, 2016 11:38 PM2016-12-25T23:38:50+5:302016-12-25T23:38:50+5:30

तीनशे बालकांवर गुन्हा : वर्षात सरासरी पंचवीस अल्पवयीन मुले विधिसंघर्षग्रस्त

Kochal childhood obstructive law! | कोवळं बालपण अडकतंय कायद्याच्या कचाट्यात !

कोवळं बालपण अडकतंय कायद्याच्या कचाट्यात !

Next

संजय पाटील ल्ल कऱ्हाड
अठरा वर्षांपर्यंतच वय निरागस. या वयात बहुतांश चुका माफ केल्या जातात; पण एखादी चूक ‘गुन्हा’ ठरत असेल तर त्या मुलाला कायद्याच्या चौकटीतून जावेच लागते. ‘विधिसंघर्षग्रस्त’ म्हणून तो मुलगा कायद्याच्या कचाट्यात सापडतो. कऱ्हाड शहर पोलिसांच्या दप्तरी २००६ पासून तीनशेहून अधिक बालके गुन्ह्यात अडकल्याची नोंद आहे. या नोंदीतून अल्पवयीन मुलांभोवती पडत असलेला गुन्हेगारीचा विळखा अधोरेखीत होतोय.
गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढत असलेला सहभाग सध्या चिंतेचा विषय बनलाय. अनेक मुले हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे तर काहीजण फक्त मौजमजेसाठी गुन्हा करीत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. कऱ्हाड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या खून, मारामारी, खुनाचा प्रयत्न, वाहनचोरी, मोनोग्राम चोरी, दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अनेक अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या मुलांमध्ये गरीब, अनाथ मुले आहेतच; पण सुखवस्तू कुटुंबातील मुलेही पोलिसांनी गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेतल्याची उदाहरणे आहेत.
काही मुलांचा गुन्हेगारी मार्गावरील प्रवासही थक्क करणारा आहे. व्यावसायिक, नोकरदार, प्रतिष्ठित कुटुंबातील मुलेही चैनीखातर गुन्ह्यांमध्ये सहभागी होत आहेत. काही मुले वाईट संगतीमुळे या मार्गाला लागल्याचेही पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. तसेच काही अट्टल गुन्हेगारांकडूनही गुन्हे करण्यासाठी बालकांचा वापर केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
अट्टल गुन्हेगारांना कायद्याची माहिती असल्यामुळे त्यांच्याकडून गुन्हे करण्यासाठी जाणीवपूर्वक बालकांचा वापर करून घेतला जातो. त्यासाठी ते बालकांना कधी पैशाचे तर कधी पाठिंब्याचे आमिष दाखवतात. या प्रलोभनाला बळी पडलेली मुले गुन्हा करून कायद्याच्या कचाट्यात अडकतात; पण कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या अशा मुलांना कायद्यातील पळवाटा शोधून बाहेर काढणे सोपे असते, हे अट्टल गुन्हेगारांना माहीत आहे. त्यामुळे ते सर्रास अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी कारवायांमध्ये उपयोग करून घेतात. अशातूनच संबंधित अल्पवयीन मुले निर्ढावतात आणि पुढे गुन्हेगारी क्षेत्राशी कायमची जोडली जाऊन आयुष्यातून उठतात.
कायदा काय सांगतो..?
अठरा वर्षांखालील बालक एखाद्या गुन्ह्यात अडकल्यास त्याला ‘आरोपी’ संबोधण्यास कायद्याने मनाई आहे. संबंधित बालकाला ‘विधिसंघर्षग्रस्त’ अशी संज्ञा तयार करण्यात आली आहे.
बालकांचा सहभाग असलेले खटले बालन्यायालयात चालविले जातात.
विधिसंघर्षग्रस्त बालकास बेड्या घालण्यासही मनाई आहे. पोलिसांनी अशा बालकासमोर जाताना साध्या वेशात जावे, असाही नियम आहे.
विधिसंषर्घग्रस्त बालकावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्याला तुरुंगात पाठविले जात नाही तर पालकांच्या निगराणीखाली त्याला बालसुधारगृहात पाठविले जाते.
संबंधित बालकाला
तत्काळ जामीन देण्याचा
अधिकारही पोलिसांना आहे.

कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात जानेवारी ते डिसेंबर २०१५ अखेर २३ अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या वर्षभरातही वीसहून अधिक बालके कायद्याच्या कचाट्यात सापडली आहेत. त्यामध्ये खून, दुचाकी चोरी, बाललैंगिक अत्याचार, शस्त्रास्त्रविरोधी कायदा, मारामारी यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. दरवर्षी २५ ते ३० गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग आढळून येतो. ही आकडेवारी धक्कादायक अशीच आहे.
चैन, मौजमजा करण्याची जडलेली सवय
कमी श्रमात जास्त पैसा मिळविण्याची इच्छा
वाईट संगत किंवा गुन्हेगारांकडून मिळणारे अभय
गुन्हा करण्यासाठी एखाद्याने प्रवृत्त केल्यास
पालक व मुलांमध्ये कमी झालेला संवाद
गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारे वातावरण

Web Title: Kochal childhood obstructive law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.