कोडोलीत हॉटेल मालकाचा निर्घृण खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 11:59 PM2019-01-15T23:59:41+5:302019-01-15T23:59:46+5:30
सातारा : सातारा-रहिमतपूर रस्त्यावरून दुचाकीवर जाणाऱ्या एका हॉटेल मालकाच्या डोक्यात हॉकी स्टिक व धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची ...
सातारा : सातारा-रहिमतपूर रस्त्यावरून दुचाकीवर जाणाऱ्या एका हॉटेल मालकाच्या डोक्यात हॉकी स्टिक व धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. कोडोली येथे मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पाठीमागून दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये कैद झाले.
दरम्यान, सायंकाळी जिल्हा रुग्णालयात मृताच्या नातेवाइकांनी तोडफोड केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सम्राट विजय निकम (वय २९, रा. कोडोली, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, सम्राट निकम याचे कोडोलीमध्ये सम्राट रेस्टॉरंट आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याच्या रेस्टॉरंटमध्ये एकाच्या दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून भांडणे झाली होती. तेव्हापासून वारंवार दोन्ही कुटुंबांमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पराविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले होते.
या भांडणाचा राग मनात धरून जाधव व निकम या दोन्ही कुटुंबांत वारंवार भांडणे होत होती. मंगळवारी दुपारी सम्राट दुचाकीवरून महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर येत होता. तेथून तो घरी परतत असताना त्याच्या पाठीमागून चौघेजण दोन दुचाकींवर आले. त्यांनी सम्राटच्या डोक्यात हॉकी स्टिकने मारहाण केली.
डोक्यातून रक्तस्त्राव होऊन सम्राट दुचाकीवरून खाली पडल्यानंतर त्याच्यावर हॉकी व धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात सम्राट गंभीर जखमी झाला. त्याने हल्लेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला; मात्र हल्लेखोर एकामागोमाग धारदार शस्त्राने सपासप वार करत असल्याने त्याचा प्रतिकार कमी पडत होता.
या हल्ल्यात सम्राटच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे तो जागीच कोसळला. हल्ल्यानंतर हल्लेखोर हत्यारे घटनास्थळी टाकून पळून गेले. त्यानंतर तातडीने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. भर रस्त्यात घडलेल्या या सर्व प्रकाराने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, सातारा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. जमावाने जिल्हा शासकीय रूग्णालयातील खिडक्यांची तोडफोड केल्याचे माहिती सोशल मीडियावरुन फिरायला लागली. त्यानंतर सातारकांनी गर्दी केली होती. वेळीच दाखल झालेल्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने अनर्थ टळला. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
काचा फोडल्याने रुग्णालयाला छावणीचे स्वरूप
सम्राटवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच निकम कुटुंबीयांनी घटनास्थळी व त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाइकांनी रुग्णालयातील काचेच्या दरवाजांची तोडफोड केल्याने तणावाचे वातावरण पसरले होते. सातारा पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.
संशयितांच्या शोधार्थ चार पथके रवाना
हल्ल्यानंतर जिल्हा रुग्णालय व कोडोली गावामध्ये तणावाचे वातावरण पसरले. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी नातेवाइकांनी आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याने तणाव वाढला. पोलिसांची चार पथके संशयितांच्या शोधासाठी रवाना झाली.