कोल्हापूर नाका बनला ‘डेंजर झोन’ !
By admin | Published: December 25, 2015 10:03 PM2015-12-25T22:03:43+5:302015-12-26T00:09:46+5:30
महामार्गावरच बसस्थानक : धोक्याची सूचना मिळूनही दुर्लक्ष
कऱ्हाड/मलकापूर : गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर नाक्यावर मद्यधुंद ट्रकचालकाने उपमार्गावर दहा जणांना जखमी केल्याची घटना घडली. या घटनेनंतर कोल्हापूर नाक्यावरील परिस्थिती बदलणे अपेक्षित होते. मात्र, आजही नाक्यावर उपमार्गासह महामार्ग खासगी बसच्या विळख्यात असल्याचे दिसते. बस चालकांनी महामार्गावरच ठिय्या मांडल्याने येथे भीषण दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्हापूर नाका परिसर दिवसेंदिवस ‘हिट अॅन्ड रन’चे ठिकाण बनत आहे. याठिकाणी महामार्गाच्या कोल्हापूर-सातारा लेनवर उड्डाणपूल नसल्यामुळे या ठिकाणी लहान-मोठ्या अपघाताची मालिकाच सुरू आहे. या अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी रात्री मद्यधुंद ट्रकचालकाने कोयना वसाहत ते कोल्हापूरनाका परिसरात बेफामपणे ट्रक चालवत चांगलाच धिंगाणा घातला. या अपघातामध्ये पाच वाहनांसह पादचाऱ्यांना धडक देत दहा जणांना जखमी केले. वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. काळ आला होता. पण वेळ आली नव्हती याची प्रचिती या घटनेतून आली. ही घटना घडून केवळ २४ तास ओलांडले नसतानाही पुन्हा दुसऱ्या दिवशी कोल्हापूर नाका खासगी प्रवासी बसने गजबजला.
रात्रीच्या वेळी उपमार्गाबरोबरच महामार्गावरही बसच्या धोकादायकरित्या रांगा लागल्या होत्या. त्यावरून एवढी मोठी दुर्घटना घडूनही पोलिसांनीही एका दिवसात या दुर्घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत होते. (प्रतिनिधी)
फूटपाथवर हातगाडे व खोकी
कोल्हापूर नाका येथील मळाई टॉवर परिसरात फूटपाथवरच काही खोकीधारकांनी व्यवसाय थाटले आहेत. तर हातगाडे व किरकोळ विक्रेत्यांनी उपमार्गाकडेलाच दिवसभर ठाण मांडलेले असते. व्यावसायिक फूटपाथवर तर ग्राहक रस्त्यावर गर्दी करतात. शुक्रवारी रात्री गर्दी नसताना गंभीर घटना घडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अशी अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रवाशांनाही गांभीर्य नाही...
मद्यधुंद ट्रकचालकाने अंदाधुंंद वाहन चालवत केलेला अपघात सर्वांना माहीत असतानाही कोल्हापूर नाक्यासह ठिकठिकाणी प्रवाशांनीही महामार्गावरच ठिय्या मांडला होता. यावरून बस एजंटासह प्रवाशांनाही आपल्या जिवाची काळजी नाही. किंवा घटनेचे गांभीर्य नाही, अशी परिसरात चर्चा होती.
पोलिसांसमोरच महामार्गावरच रांगा
कोल्हापूर नाक्यावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात केलेले असतात. शुक्रवारी घडलेल्या घटनेनंतरही शनिवारी व रविवारी रात्री पोलिसांसमोरचं राजरोसपणे खासगी बसच्या महामार्गावरच रांगा लागल्या होत्या.