कोपर्डे हवेलीत जनावरांना लाळीची साथ
By admin | Published: December 6, 2015 10:53 PM2015-12-06T22:53:48+5:302015-12-07T00:28:03+5:30
शेतकरी हवालदिल : पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लसीकरण मोहीम
कोपर्डे हवेली : परिसरातील पाळीव जनावरांना गत आठ दिवसांपासून लाळीच्या साथीची लागण झाली आहे. अनेक शेतकरी पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबर देशी उपाय करत असल्याचे चित्र दिसत आहे.
लाळ ही वाऱ्याबरोबर पसरणारी साथ असल्याने अनेक जनावरांना लाळीची बाधा झाली आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सह्याद्री कारखान्याच्या कार्यस्थळावर लसीकरणाचे काम सुरू आहे. हवेत पसरणारा हा रोग असल्याने कित्येक किलोमीटर याची जनावरांना बाधा होत असते. त्यासाठी लाळीपूर्वी लसीकरण महत्त्वाचे असते; मात्र काही जनावरांचे लसीकरण राहिल्याने व पुन्हा लसीकरण न झाल्याने जनावरांना बाधा होते. बैल, म्हैस, गाय आदी जनावरांना लाळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. साथीची लागण झालेल्या जनावरांमध्ये अनेक लक्षणे दिसून येतात. जनावरांच्या जिभेला काटे येतात. तसेच तोंडातून लाळ गळते. जनावरे अशक्त बनतात. पायाच्या नख्यांना जखमा होतात. जनावरांचे अंग कापते. ताप येतो. शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये त्याची लस मिळते. जनावरे बरी होण्यासाठी सुमारे दहा- बारा दिवसांचा कालावधी लागतो. शेतकरी देशी उपाय म्हणून जनावरांना कोथिंबिर, केळी आदी खायला घालत आहेत. त्यामुळे जनावरांची लाळजाते. नख्यांना जखमा झालेल्या ठिकाणी गरम पाणी टाकत आहेत. तसेच किडे मारण्यासाठी पायावर रॉकेल शिंपडले जात आहे. पार्ले, कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे, सह्याद्री कारखाना, नडशी, शिरवडे, वडोली निळेश्वर, शहापूर आदी गावांतील जनावरांना लाळ आली असून, शेतकरी लाळीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करत आहेत. (वार्ताहर)
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जनावरे लाळीने बाधित झाली आहेत. आम्ही लसीकरणाचे काम हाती घेतले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांना लाळ आली आहे, त्यांनी तातडीने संपर्क साधावा. जनावरांवर वेळीच उपचार न झाल्यास दगावण्याची शक्यता असते.
- डॉ. एस. के. शेगर, पशुवैद्यकीय अधिकारी, कोपर्डे हवेली