कोपर्डे हवेलीच्या ग्रामस्थांना पुन्हा धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:34 AM2021-03-15T04:34:45+5:302021-03-15T04:34:45+5:30
गतवर्षी कोरोना बाधित रुग्ण सापडत असताना सुरुवातीचे सहा महिने खबरदारी घेत ग्रामस्थांनी कोरोनाचा गावात प्रवेश होऊ दिला नव्हता. त्यानंतर ...
गतवर्षी कोरोना बाधित रुग्ण सापडत असताना सुरुवातीचे सहा महिने खबरदारी घेत ग्रामस्थांनी कोरोनाचा गावात प्रवेश होऊ दिला नव्हता. त्यानंतर मात्र रुग्णांचा आकडा वाढत गेला. काहींचा त्यामध्ये बळीही गेला. दोन महिन्यांपूर्वी बाधितांची संख्या कमी झाली होती. गावात एखादा रुग्ण आढळत होता. त्यानंतर गाव कोरोनामुक्तही झाले होते. त्यावेळी कोरोना प्रतिबंधक म्हणून मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्स आदी बाबी पाळल्या जात होत्या. सलग दहा दिवस गावातील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. तर गर्दी होऊ नये, यासाठी मंडई बंद होती. मात्र, गत काही दिवसांत बेफिकीरी वाढल्याचे दिसून येत आहे. कोपर्डे हवेली हे जिल्हा परिषद गटातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. सध्या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांचा काळजाचा ठोका चुकला आहे. प्रत्येकाने स्वत:च्या काळजीबरोबर इतरांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अन्यथा बेफिकिरी अंगलट येऊ शकते. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
- चौकट
लसीकरणाबाबत जनजागृती गरजेची!
कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे. टप्प्याटप्प्याने ही लस देण्यात येत असून प्रत्येकाने लस टोचून घेणे गरजेचे असताना लस टोचून घेण्यासाठी हवा तसा प्रतिसाद दिसत नाही. अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गैरसमजामुळे ही परिस्थिती निर्माण होत असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणाबाबत आरोग्य विभागाने जनजागृती करणे गरजेचे आहे.