कोरेगाववासियांना आता २४ तास वीज
By admin | Published: June 16, 2017 02:07 PM2017-06-16T14:07:45+5:302017-06-16T14:07:45+5:30
समस्येतून सुटका : सातारारोड ऐवजी आता कोरेगाव उपकेंद्रातून पुरवठा
आॅनलाईन लोकमत
कोरेगाव , दि. १७ : कोरेगाव शहरातील सातत्याने खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण कंपनीने जालीम उपाय शोधून काढला आहे. शहरालगत औद्योगिक वसाहतीत असलेल्या उपकेंद्रातून कोरेगाव शहराला वीज पुरवठा केला जाणार आहे. सातारारोड उपकेंद्राऐवजी कोरेगावातूनच शहराला वीज पुरवठा होणार असल्याने तो अखंडीत राहणार आहे.
महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संजय साळे व कार्यकारी अभियंता सुनील माने यांच्या विशेष प्रयत्नामुळे आणि आमदार शशिकांत शिंंदे यांच्या सहकायार्तून कोरेगाव औद्योगिक वसाहत उपकेंद्रामध्ये मोठी क्षमता असलेला ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून, त्यावरुन शहराला वीजपुरवठा करण्याचा शुभारंभ मंगळवारी सायंकाळी उपकार्यकारी अभियंता अभिजीत महामुनी व शहर शाखेचे सहाय्यक अभियंता संतोष तळपे यांच्या हस्ते झाला.
शहराची लोकसंख्या मोठी असून, सुमारे साडेपाच हजार वीज ग्राहक आहेत. यापूर्वी असलेल्या मॅफको कंपनीमुळे सातारारोड उपकेंद्रातून कंपनीला आणि शहराला वीज पुरवठा केला जात होता. या वीज वाहिनीवर सातारारोड हे गाव देखील होते, तसेच जरंडेश्वर डोंगराच्या पायथ्यावरुन वीज वाहिनी गेली असल्याने पावसाळ्यात आणि विशेषत वळिव पावसात कोरेगाव शहरातील वीज पुरवठा सातत्याने बंद राहत होता. अगोदरच अपुरे कर्मचारी आणि वाढते वीज ग्राहक यामुळे कर्मचाऱ्यांना तारेवरील कसरत करत देखभाल व दुरुस्तीची कामे करावी लागत होती.
कोरेगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता म्हणून अभिजीत महामुनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील वीज पुरवठ्यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी मोठ्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचा प्रस्तावाचा पाठपुरावा केला. आमदार शशिकांत शिंंदे यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी समन्वय ठेवत, त्यासाठी निधीची तरतूद देखील करुन घेतली होती. गेली दोन महिने सातारारोड ऐवजी कोरेगाव औद्योगिक वसाहत उपकेंद्रातून शहराला वीज पुरवठा करण्याच्या वीज वाहिन्यांचे काम सुरु होते. गेली चार दिवस प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली. अभिजीत महामुनी व संतोष तळपे यांनी वीज पुरवठ्याचा प्रारंभ केला.
मोठी समस्या सोडविण्यात यश
कोरेगावात पदभार स्वीकारल्यानंतर समोर असलेली मोठी समस्या सोडविण्याचे भाग्य लाभले आहे. शहरवासियांना आता २४ तास अखंडीत वीज पुरवठा होणार आहे. नजिकच्या काळात वीज वाहिनी मजबुतीकरणाचे काम सुरु राहणार आहे, त्यामुळे काही काळासाठी वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. विशेषत मंगळवारी दुरुस्तीचे काम केले जाईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे.
- अभिजीत महामुनी,
उपकार्यकारी अभियंता, कोरेगाव.