कोरेगाव-भीमाप्रकरण : रिपाइं आठवले गटाच्या फलटण तालुका पदाधिका-यांची राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 01:20 PM2018-01-14T13:20:29+5:302018-01-14T13:23:16+5:30
कोरेगाव-भीमाप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई न करणा-या भाजपा सरकारला रिपाइं आठवले गट साथ देत असल्याच्या कारणावरून भाजप व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा निषेध करत फलटण तालुका पदाधिका-यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
फलटण (सातारा) : कोरेगाव-भीमाप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई न करणा-या भाजपा सरकारला रिपाइं आठवले गट साथ देत असल्याच्या कारणावरून भाजप व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा निषेध करत फलटण तालुका पदाधिका-यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामध्ये अध्यक्ष हरीष काकडे, शहराध्यक्ष युवराज काकडे, तालुका पूर्वभाग युवाध्यक्ष मनोज आढाव व त्यांच्या सहका-यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘गेल्या पंधरा वर्षांपासून रिपाइं आठवले या पक्षामध्ये सदस्य पदापासून ते 2011 मध्ये नियुक्ती झालेल्या तालुकाध्यक्षपदापर्यंत सामाजिक व राजकीय काम एकनिष्ठेने पाहिले. त्याचबरोबर पक्षवाढीसाठी फलटण तालुक्यामध्ये अत्यंत तळमळीने काम पाहिले. महिला अत्याचार किंवा दिव्यांगांसह सामान्य जनतेला शासकीय योजना पोहोचविण्यासाठी मोर्चे, रास्ता रोको, घंटानाद, धरणे, बेमुदत उपोषण व इतर आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व शहरातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी रिपाइंच्या माध्यमातून आंदोलने केली. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही फलटण शहराध्यक्ष युवराज काकडे, फलटण तालुका पूर्व भाग तालुकाध्यक्ष मनोज आढाव, फलटण तालुक्यामध्ये कार्यरत असणा-या सर्व शाखा प्रमुखांबरोबर तालुकाध्यक्ष हरीष काकडे एकत्रित राजीनामा देत आहोत. हे राजीनामे रिपाइंचे जिल्हा सचिव विजय यवले यांच्याकडे दिले आहेत.