कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा

By नितीन काळेल | Published: August 1, 2024 08:12 PM2024-08-01T20:12:16+5:302024-08-01T20:12:46+5:30

'विरोधकांकडून मतदार नावे रद्दसाठी प्रयत्न सुरू'

Koregaon Constituency Election Democracy Vs. Dictatorship; Warning by Shashikant Shinde | कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा

कोरेगाव मतदारसंघाची निवडणूक लोकशाही वि. हुकुमशाही होणार; शशिकांत शिंदे यांचा इशारा

सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया सुरू असून विरोधकांकडून नावे रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीचा हा सरळ-सरळ खूनच आहे. यामध्ये अधिकारीही दबावाखाली काम करतात. त्यामुळे प्रांत कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहे. त्याचबरोबर कोरेगाव मतदारसंघातील निवडणूक ही लोकशाही विरोधात हुकुमशाही अशीच होईल, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, गेल्या काही वर्षांत निवडणुकांचा ट्रेंड बदलत चाललाय. मतदान यंत्रावर शंका उपस्थित होत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीमुळे मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातही प्रक्रिया पार पडत आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दुर्दैवाने विरोधी मतदारांची नावे रद्द करण्याचा प्रयत्न सुरू आहे. १६ आॅगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून दररोज दीड ते दोन हजार हरकती येत आहेत. २० हजारांपर्यंत या हरकती जातील. याबाबत प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे. कोणी खोटी हरकत घेतली असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. कारण, तशी तरतूद आहे. अधिकारीही दबावाखाली काम करतायत. यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शुक्रवारी प्रांत कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहे. लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही.

कोरेगाव मतदारसंघात विरोधकांकडून षडयंत्र सुरू आहे, गेल्या महिन्यापासून हे नियोजनपूर्वक सुरू झाले आहे. ज्यांची मते मिळणार नाहीत, त्यांच्याबाबतच हे होत आहे. त्याला शासकीय यंत्रणा मदत करत आहे. याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत पाहिजे तेवढे मताधिक्य मिळाले नाही म्हणूनही हा प्रकार होत आहे, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

काॅंग्रेसच्या टोलच्या आंदोलनात उतरण्याचा विचार...

राष्ट्रीय काॅंग्रेस पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेबाबत शनिवारी टोलनाक्यावर आंदोलन करणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी सामील होणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर आमदार शिंदे यांनी या महामार्गाबाबत वारंवार आवाज उठवला आहे. खराब रस्ता असूनही टोलमध्ये वाढ होत आहे. यासाठी एक दिवसाचे नाही तर दररोज आंदोलन करण्याची गरज आहे. काॅंग्रेसच्या या आंदोलनात उतरण्याचा विचार आहे, असे सांगितले.
 

आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत निर्णय व्हावा...
राज्यातील मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न केल्यावर आमदार शिंदे यांनी मराठा, ओबीसी, धनगर समाजाबाबतच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. ही जबाबदारी सरकारची आहे. तरीही शासनाने सर्वपक्षीय बैठक बोलवून निर्णय घ्यावा. तसेच केंद्र शासनानेही आपली भूमिका जाहीर करावी, असे स्पष्ट केले.

Web Title: Koregaon Constituency Election Democracy Vs. Dictatorship; Warning by Shashikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.