कोरेगावचे उपजिल्हा रुग्णालय कोरोनाग्रस्तांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:36 AM2021-04-19T04:36:21+5:302021-04-19T04:36:21+5:30

कोरेगाव : सरकारी दवाखाना म्हटलं की नको रे बाबा... अशी काही वर्षांपूर्वी परिस्थिती होती. मात्र कोरोनाने जागतिक महामारी असल्याचे ...

Koregaon Sub-District Hospital resuscitates the victims | कोरेगावचे उपजिल्हा रुग्णालय कोरोनाग्रस्तांना संजीवनी

कोरेगावचे उपजिल्हा रुग्णालय कोरोनाग्रस्तांना संजीवनी

Next

कोरेगाव : सरकारी दवाखाना म्हटलं की नको रे बाबा... अशी काही वर्षांपूर्वी परिस्थिती होती. मात्र कोरोनाने जागतिक महामारी असल्याचे दाखवून दिल्यानंतर सर्वांनीच आता सरकारी दवाखान्यांचा रस्ता धरला आहे. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाने कोरोनाबाधितांच्या सेवेत वर्षभर राहून ५४० पैकी ५२३ रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. लसीकरणामध्येही या रुग्णालयाने अव्वल स्थान पटकावले आहे. ही किमया करून दाखविली आहे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने.

कोरोना हे नाव वैद्यकीय क्षेत्रात नोव्हेंबर-डिसेंबर २०१९ पासून माहीत पडू लागले. भारतात त्याचे आगमन फेब्रुवारी २०२० मध्ये झाले आणि तोपर्यंत ग्रामीण भागात ‘कोरोना म्हणजे काय तरी हाय’ एवढीच चर्चा होती. आरोग्य विभागाने कोरोनाची दाहकता जाणली आणि तालुकास्तरावर कोरोना केअर सेंटर्स सुरू केली. कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात ६ मार्च २०२० रोजी कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले. ३० बेड्सची सुरुवातीला व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यामध्ये आमूलाग्र बदल करत आयसीयूसह अन्य अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली. वर्षभरात ५४० रुग्ण या सेंटरमध्ये दाखल झाले, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले, त्यामुळे ९९ टक्के म्हणजेच ५२३ रुग्ण बरे होऊन घरी सुखरूप परतले. दुर्दैवाने केवळ १७ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज करपे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संजय चिवटे, डॉ. अभिजित पवार, डॉ. अरुण जाधव, डॉ. नीलेश दबडे यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाला हरविण्याचे ध्येय ठेवले आहे.

(पॉइंटर)

लसीकरण व चाचण्या :

एकूण लसीकरण : ६ हजार ५३

पहिला डोस : ४,९२८

दुसरा डोस : १,१२५

आरटीपीसीआर चाचण्या : ९,४६१

रॅट चाचणी : २,३८१

(चौकट)

उपचारांमध्येच नव्हे तर रिपोर्टिंगमध्ये अव्वलच

डॉ. युवराज करपे यांनी पहिल्या दिवसापासून अद्ययावत कामकाजाला प्राधान्य दिले आहे. कोरोनाचे प्रमाण कमी-अधिक होत असले तरी वर्षभरात त्यांनी रुग्ण तपासणी व औषधोपचारासह दैनंदिन रिपोर्टिंगला महत्त्व दिले आहे. त्यांच्या समयसूचकतेमुळे अन्य अधिनस्त अधिकारी व कर्मचारीदेखील त्याप्रमाणेच कार्यवाही करत आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात उपचारांमध्येच नव्हे तर रिपोर्टिंगमध्ये देखील कोरेगाव उपजिल्हा रुग्णालय अव्वल ठरले आहे.

(चौकट)

मुक्काम पोस्ट उपजिल्हा रुग्णालय

डॉ. युवराज करपे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संजय चिवटे, डॉ. अभिजित पवार, डॉ. अरुण जाधव, डॉ. नीलेश दबडे यांच्यासह आरोग्य कर्मचा-यांनी वर्षभर आपले मुक्काम पोस्ट उपजिल्हा रुग्णालयच ठेवले आहे. जिल्हास्तरीय बैठक, तालुकास्तरीय बैठक, मंत्रिगणांच्या आढावा बैठकींना उपस्थित राहून रिपोर्टिंग केल्यानंतर आरोग्य विभागाचा लवाजमा पुन्हा उपजिल्हा रुग्णालयातच धडकतो. वर्षभरात त्यांनी या रुग्णालयालाच आपले घर बनवून टाकले आहे.

Web Title: Koregaon Sub-District Hospital resuscitates the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.