कोरेगाव तालुक्यात कोरोनावाढीचा वेग घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:13+5:302021-05-24T04:38:13+5:30
कोरेगाव : प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाने घेतलेल्या परिश्रमामुळे कोरेगाव तालुक्यात कोरोनावाढीचा वेग आता मंदावू लागला आहे. विविध रुग्णालये ...
कोरेगाव : प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य विभागाने घेतलेल्या परिश्रमामुळे कोरेगाव तालुक्यात कोरोनावाढीचा वेग आता मंदावू लागला आहे. विविध रुग्णालये आणि कोविड हॉस्पिटल्समध्ये आता बेड्स उपलब्ध होऊ लागले आहेत. जिल्हा प्रशासन कडक लॉकडाऊन करत असले तरी त्याची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी झाल्यास कोरेगाव तालुका लवकरच कोरोनामुक्त होऊ शकणार आहे.
तालुक्यामध्ये कोरेगाव येथे उपजिल्हा रुग्णालय, पिंपोडे बुद्रुक येथे ग्रामीण रुग्णालय, तडवळे संमत कोरेगाव, किन्हई, सातारारोड, पळशी, वाठार स्टेशन, रहिमतपूर व वाठार किरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. सर्वच ठिकाणी कोरोनासाठीची अँटिजन, आरटी-पीसीआर टेस्ट आदी सुविधा आहे. दररोज संशयित रुग्णांची तपासणी केली जात असल्याने रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. जेवढे बाधित होत आहेत, त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
कोरोनाविरुध्दच्या लढाईत लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि खासगी वैद्यकीय व्यावसायिक एकत्रित आले आहेत. त्यांनी जिल्ह्यात एक वेगळा पायंडा पाडला आहे. सद्य:स्थितीत चार व्हेंटिलेटर बेड्स, २०७ ऑक्सिजन बेड्स, ३२४ साधे बेड्स तालुक्यात उपलब्ध आहेत. केवळ कोरेगावच नव्हे तर खटाव-माण तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक रुग्ण कोरेगाव तालुक्यात उपचार घेत आहेत. सद्य:स्थितीत ५४३ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. १३०० पेक्षा जास्त रुग्ण गृहविलगीकरणामध्ये उपचार घेत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून कडक लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे रविवारी बाजारपेठेत तुडुंब गर्दी पहावयास मिळाली. सोमवारपासून प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्यास कोरेगाव तालुक्यातून कोरोना लवकरच हद्दपार होण्यास मदत होणार आहे.