कोरेगावच्या निवडणुकीत एक मत भारी

By admin | Published: June 16, 2015 10:22 PM2015-06-16T22:22:51+5:302015-06-17T00:42:39+5:30

संघ निवडणूक : १२-३ ने उडविला विरोधी पॅनेलचा धुव्वा; विद्यमान अध्यक्षांचा पराभव

In Koregaon's elections, one vote heavy | कोरेगावच्या निवडणुकीत एक मत भारी

कोरेगावच्या निवडणुकीत एक मत भारी

Next

कोरेगाव : कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या अतितटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनेलने १२ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. काँग्रेससह मित्रपक्षांच्या दिवंगत आमदार दत्ताजीराव बर्गे शेतकरी विकास पॅनेलला निसटता पराभव स्वीकारावा लागला असून त्यांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे. विद्यमान चेअरमन तानाजीराव शिंदे व संचालक दत्तात्रय धुमाळ यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
संघाच्या १५ जागांसाठी ३१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले होते. संघाचे २४६३ सभासद मतदानासाठी पात्र होते. त्यापैकी २३०२ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला आणि शांततेत सुमारे ९३.४६ टे मतदान झाले होते. सोमवारी सकाळी ८ वाजता कोरेगाव बाजार समिती आवारातील केडर सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी युसूफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणीस सुरुवात झाली.
सायंकाळी ५ वाजता निकाल ध्वनीक्षेपकावरुन जाहीर करण्यात आला. त्यानंतर विजयी व पराभूत उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली होती. त्याचवेळी पराभूत म्हणून जाहीर केलेल्या महिला उमेदवाराने फेरमतमोजणीची मागणी करत अनामत रक्कम जमा केली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी युसूफ शेख यांनी फेरमतमोजणीस सुरुवात केली. रात्री ११.४० च्या सुमारास मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली.
संघाचे विद्यमान चेअरमन तानाजीराव शिंदे यांना १०४६ मते मिळाली. त्यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. त्याचबरोबर विद्यमान संचालक दत्तात्रय धुमाळ यांना १०३१ मते मिळाली. त्यांचा १६ मतांनी पराभव झाला. शैला निकम यांनी ११२१ मते मिळाल्याने त्यांना पराभूत जाहीर करण्यात आले होते. त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याने रात्री फेरमतमोजणी करण्यात आली.
त्यामध्ये शैला निकम यांच्या मतांमध्ये दोनने वाढ झाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार खात्याला गटसचिव संघटनेने सहकार्य केले. उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश धस व पोलीस जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)

हुकूमशाही प्रवृत्ती हद्दपार : शिंदे
सभासदांची संस्था ही सभासदांकडेच रहावी, तेथे हुकूमशाही प्रवृत्तीचे लोक येऊ नयेत यासाठी आम्ही प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली निवडणुकीला सामोरे गेलो. विरोधकांनी नेहमीप्रमाणे चुकीचे आरोप करण्यात धन्यता मानली. केवळ विरोधासाठी विरोध करणाऱ्यांना सभासदांनी मतपेटीतून जागा दाखवून दिली आहे. सभासदांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे. संघाच्या माध्यमातून आता शेतकरी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल आणि संघ नावारुपाला आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी प्रतिक्रिया आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हा राष्ट्रवादीचा नैतिक पराभवच : बर्गे
ही लढाई सभासदांची संस्था टिकावी म्हणून होती, मात्र आ. शिंंदे यांनी निवडणुकीत लक्ष घालून ती राजकीय केली. आ. शिंदे यांनी सभासदांना दूरध्वनी करुन मतपरिवर्तन केले, त्यामुळे आमच्या पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. माझी लढाई गैरव्यवहार करणाऱ्यांच्या विरोधात होती, ते देखील पराभूत झाल्यामुळे आता संघात चांगला कारभार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमचा पराभव तांत्रिक असून, राष्ट्रवादीचा नैतिक पराभव झाला आहे, अशी प्रतिक्रिया दिवंगत आमदार दत्ताजीराव बर्गे शेतकरी विकास पॅनेलचे प्रवर्तक मनोहर बर्गे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढीलप्रमाणे -
शहाजीराव बर्गे (११३८), शहाजी भोईटे (११०९), अदिक माने (१०८०), प्रल्हाद माने (१०७५), भागवत घाडगे (१०५१), काकासाहेब बर्गे (१०४९), मुकुंद जगदाळे (१०४७), विद्याधर बाजारे (११५८), निर्मला जाधव (११३३), शैला निकम (११२३), आप्पा चव्हाण (११५१) व गंगाराम खताळ (११५६).
दिवंगत आमदार दत्ताजीराव बर्गे शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात पुढीलप्रमाणे -
मनोहर बर्गे (११२०), किशोर बर्गे (१०६६), प्रल्हाद धुमाळ (१०५५).

Web Title: In Koregaon's elections, one vote heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.