मकरंद आबांच्या हाती कासरा
By admin | Published: May 28, 2017 11:41 PM2017-05-28T23:41:17+5:302017-05-28T23:41:17+5:30
मकरंद आबांच्या हाती कासरा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या मंत्र्यांनी राज्यात संवाद यात्रा सुरू केली आहे. गावोगावच्या शेतातील बांधावर जात त्यांनी संवाद सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर दुसरीकडे वाई विधानसभा मतदारसंघातील आमदार मकरंद पाटील यांनी कोणत्याही महागड्या चारचाकीत न बसता बैलगाडी चालवत आपण पूर्वीपासूनच शेतकऱ्यांशी संवाद साधत असल्याचा संदेश दिला. वाई तालुक्यातील
बावधनमधील त्यांच्या या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
लोकप्रतिनिधी म्हटले की महागडी चार चाकी कार त्यांच्याकडे असते. त्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा लवाजामा असतो. हे चित्र सर्वत्र दिसत असते. असे असले तरी वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी चक्क बैलगाडीतून सफर केली. ऐवढेच नाही तर स्वत: बैलगाडी चालविण्याचा आनंदही घेतला. शेतकरी पार्श्वभूमी असल्याने मकरंद पाटील यांनी बावधन येथील भेटीत स्वत:
बैलगाडी चालविण्याचा हा आगळावेगळा आनंद घेतला आहे.
याचे असे झाले की, बावधन येथील मदन माधवराव भोसले हे प्रगतशिल शेतकरी आमदार मकरंद पाटील यांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी नुकतीच नवीन डौलदार बैलजोडी खरेदी केली आहे. ही बैलजोडी पाहण्यासाठी त्यांनी आमदार पाटील यांना निमंत्रण दिले होते. आपल्या कामात व्यस्त असलेले आमदार पाटील वेळ काढून भोसले यांच्या शेतावर गेले. नवीन बैलजोडी पाहून त्यांच्यातील शेतकरी जागा झाला आणि त्यांनी चक्क बैलाचा कासरा हातात घेतला. बैलांना थोडे शेतातच फिरविले आणि बैलगाडीला जुंपले. बैलगाडीत बसून त्यांनी एक फेरी मारली.