व्यावसायिकांना कोविड तपासणी अनिवार्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:07+5:302021-04-17T04:38:07+5:30
पाचगणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा दर वाढतच चालला आहे. पाचगणी शहरासह परिसरातही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळेच छोटे-मोठे व्यावसायिक ...
पाचगणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा दर वाढतच चालला आहे. पाचगणी शहरासह परिसरातही रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळेच छोटे-मोठे व्यावसायिक ज्यांच्याकडे तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आहे, अशा दुकानदारांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करण्यासाठी पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी केली होती.
शहर परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने संचारबंदीनंतर आणखी कठोर पाऊल उचलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, भाजीपाला, फळ, दूध विक्रेते आणि किराणा दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोविड तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या व्यापाऱ्याकडे कोविड निगेटिव्ह असलेले प्रमाणपत्र असेल त्यालाच दुकान उघडण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती पाचगणी गिरीस्थान नगरपालिकेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते आणि इतर व्यापाऱ्यांशी समन्वय साधून पालिकेने दुकानदारांना तपासणी करून घ्यावी; मगच दुकान उघडावे, असे आवाहन केले आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे कोरोना तपासणी केलेले निगेटिव्हचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात येईल. कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन ह अधिक संसर्गजन्य असून, सर्वाधिक नुकसानकारक आहे. त्यामुळे सुपरस्प्रेडर असणाऱ्या किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेत्यांनी कोरोना चाचणी व लसीकरण करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने सर्वांनी लवकरात लवकर चाचणी करून घ्यावी, असेही दापकेकर यांनी सांगितले.
चौकट :
पाचगणीकरांना आवाहन...
पाचगणी शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. ज्या व्यापाऱ्याकडे कोरोना तपासणी केलेले प्रमाणपत्र नसेल त्याच्याकडून कोणतेही सामान खरेदी करण्यात येऊ नये, असे आवाहन मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणीकरांना केले.
१६पाचगणी
पाचगणीमध्ये कोविड तपासणीकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात व्यावसायिकांची गर्दी झाली होती.