पोत्यात आढळले कोयते अन् तलवारी, साताऱ्यातील एकजण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 05:54 PM2021-07-30T17:54:35+5:302021-07-30T17:58:05+5:30
Crimenews Satara : सातारा जिल्हा पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने रात्रगस्त दरम्यान साताऱ्यातील एका तरुणाला ताब्यात घेऊन ११ धारदार शस्त्रे जप्त केली. यामध्ये ७ लांब कोयते अन् ४ धारदार तलवारींचा समावेश आहे. दरम्यान, पकडलेल्या युवकाला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील जिल्हा विशेष शाखा व दहशतवाद विरोधी पथकाने रात्रगस्त दरम्यान साताऱ्यातील एका तरुणाला ताब्यात घेऊन ११ धारदार शस्त्रे जप्त केली. यामध्ये ७ लांब कोयते अन् ४ धारदार तलवारींचा समावेश आहे. दरम्यान, पकडलेल्या युवकाला सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्ह्यात आढळून येणार्या बेकायदेशीर शस्त्राबाबत कारवाई करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. त्यानुसार जिल्हा विशेष शाखा व दहशतवाद विरोधी पथक गुरुवारी रात्री शहरात पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी विभुते, प्रताप भोसले, हवालदार सागर भोसले, सुमित मोरे, केतन जाधव, राहुल वायदंडे हे सातारा शहर व परिसरात रात्रगस्त करीत होते. त्यावेळी रात्री नऊच्या सुमारास दिव्यानगरी ते कोंडवे रस्त्यावर गोवर्धन कॉलनी येथे एक अनोळखी तरुण या पथकास पाहून तेथील नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतीच्या मागे जाऊन लपून बसला.
हे पाहताच पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन चौकशी केली. तसेच त्याची वागणूक व हालचालीवरून संशय वाढला. त्यावेळी झडती घेतली असता त्याच्याजवळ एका पोत्यात ११ धारदार शस्त्रे मिळाली. यामध्ये ७ लांब कोयते आणि ४ धारदार तलवारीचा समावेश आहे.
याची किंमत १८५०० रुपये आहे. याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले. संबंधितांचे नाव सचिन बाळू चव्हाण (वय २८, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने तरुणाला पकडले. त्यानंतर त्याला सातारा पोलीस ठाण्यात ताब्यात दिले. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.