अतिवृष्टीमुळे कोयना परिसरात कोसळतायेत दरडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:40 AM2021-07-27T04:40:53+5:302021-07-27T04:40:53+5:30
रामापूर : पाटण तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मोरणा आणि कोयना परिसरात डोंगर खाली येत असल्याने पाटण तालुक्यातील मिरगाव, हुबरळी, ...
रामापूर : पाटण तालुक्यात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे मोरणा आणि कोयना परिसरात डोंगर खाली येत असल्याने पाटण तालुक्यातील मिरगाव, हुबरळी, ढोकवले, किल्ले मोरगिरी, धावडे शिद्रुकवाडी, नेरळे, तारळे पांढरवाडी, नावाडी वेताळवाडी, दीक्षी धावडे या गावांतील सुमारे एक हजार नागरिकांना विभागातील हायस्कूल आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्याठिकाणी पाटण तालुक्यातील सामाजिक संस्था, राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांकडून लोकांना मदतीचा ओघ सुरूच आहे.
पाटण तालुक्यात मागील ४० वर्षांत कधी इतका पाऊस कधी झाला नाही, असा अभूतपूर्व पाऊस पडला. या पावसाने तालुक्यातील अनेक दरडी कोसळल्यामुळे अनेकांचे जीव गेलेत, तर अनेक दरडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तेथील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शाळांच्या वर्गखोल्यांत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या लोकांकरिता समाजातील सर्वच स्तरातून मदत येत आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दळणवळणाची सुविधा नसल्याने त्यांना देखील मदतीचा आधार दिला जात आहे. यामध्ये तालुक्यातील युवक, सामाजिक संस्था मदतीसाठी पुढे येत असून, मदतीत पिण्यासाठी पाणी, तांदूळ, डाळी, चटणी कपडे आदींचा समावेश आहे.