कोयना पुलावरून युवतीची नदीत उडी
By admin | Published: February 4, 2017 12:01 AM2017-02-04T00:01:13+5:302017-02-04T00:01:13+5:30
कऱ्हाडातील घटना; शोध सुरू; पर्ससह इतर साहित्य आढळले
कऱ्हाड : येथील नवीन कोयना पुलावरून महाविद्यालयीन युवतीने नदीपात्रात उडी घेतली. शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात संबंधित युवतीचा शोध घेतला जात होता.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड येथे कोल्हापूर नाक्यानजीक कोयना नदीवर पूल असून, या पुलाच्या फूटपाथवर दुपारी एक युवती थांबली होती. काही वेळानंतर संबंधित युवतीने कोणाला काही समजण्यापूर्वीच नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार एका युवकाच्या निदर्शनास आला. त्याने त्याठिकाणी धाव घेऊन युवतीपाठोपाठ नदीत उडी घेतली. त्याने युवतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये त्याला अपयश आले. युवती न सापडल्याने संबंधित युवक नदीपात्रातून बाहेर पडला. दरम्यान, ही घटना समजताच पुलावर बघ्यांची गर्दी झाली. तसेच काही वेळात शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारीही त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी युवती पाठोपाठ नदीत उडी घेणाऱ्या युवकाकडे चौकशी केली. सर्व घटनेची माहिती त्याच्याकडून घेण्यात आली. त्यानंतर काही पाणबुडे नदीपात्रात उतरले. त्यांनी नवीन पुलापासून कृष्णामाई घाटापर्यंत नदीपात्रात शोध घेतला. मात्र, संबंधित युवती आढळून आली नाही. शोध सुरू असतानाच पाणबुडींना नदीपात्रात एक पर्स व इतर साहित्य आढळून आले. त्या पर्समध्ये आढळलेल्या साहित्यावर पौर्णिमा प्रकाश अरबुणे (रा. नांदगाव) असे नाव आहे. नदीपात्रात उडी घेतलेल्या युवतीचेच ते साहित्य असावे, असा पोलिसांचा कयास आहे. संबंधित युवतीही घरातून बेपत्ता असून, नातेवाईकही तिचा शोध घेत आहे. कोयना नदीपात्रात रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात येत होता. मात्र, युवती सापडली नव्हती. अखेर अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. या घटनेची नोंद कऱ्हाड शहर पोलिसांत झाली
आहे. (प्रतिनिधी)