कोयना सहकारी बॅकेला ३२१.७४ लाखांचा ढोबळ नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:17+5:302021-04-07T04:40:17+5:30
पत्रकात म्हटले आहे की, बॅंकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली व पुणे जिल्हा असून बँकेच्या १२ ...
पत्रकात म्हटले आहे की, बॅंकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली व पुणे जिल्हा असून बँकेच्या १२ शाखा कार्यरत आहेत. बँकेची सुसज्य असे स्वमालकीची मुख्य कार्यालय इमारत पूर्णत्वास आली आहे. बँकेचे मार्गदर्शक व माजी सहकार मंत्री दिवंगत विलासराव पाटील तसेच संस्थापक ॲड. उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक शिस्तीची जोड दिली आहे. योग्य नियोजन, त्याला आधुनिक तंत्राची जोड त्याचबरोबर बँकेचे संचालक मंडळ यांनी बँकिंग कामकाज नि:स्वार्थपणे विश्वस्तांच्या भूमिकेतून केले आहे.
बँकेने शेतकरी, छोटे-मोठे व्यावसायिक, महिला बचत गट तसेच सर्वसामान्य जनतेच्या लहान-मोठ्या गरजा भागविण्यासाठी अर्थसाहाय्य केले आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसायसाठी प्राधान्याने कर्ज पुरवठा केला तर शेतकरी सामान्य जनतेच्या कौटुंबिक, शेतीविषयक व निकडीच्या आर्थिक गरजेला बँक कायमच धावून गेली आहे. लघुउद्योजक व्यापारी नोकरदार यांना ही आपलेपणाची सेवा बँकेने उपलब्ध करून दिली आहे. आज बँकेचे कार्य सर्वसामान्यांच्या घराघरात पोहोचले आहे.
बँकेची सांपत्तिक स्थिती भक्कम झाली असून नुकत्याच संपलेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात बँकेचा ढोबळ नफा ३२१.७४ लाख असून तरतुदी व कर वजा जाता बँकेस ९४.१७ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. भाग भांडवल ५.६९ कोटी, निधी ११.३३ कोटी, ठेवी . १४२.३४ कोटी, कर्जे ९९.३८ कोटी, सीआरएआर १३.५९ टक्के तर१४१.७२ कोटीचा एकत्रित व्यवसाय झाला आहे. कोरोनाच्या काळातही बँकेचा ग्रॉस एनपीए ४.९७ टक्के तर निव्वळ एनपीए ०.४६ टक्के अशी विश्वासार्ह कामगिरी केली आहे. बँक स्थापनेपासून नफ्यात असून बँकेस स्थापनेपासून सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे.
बँकेने कोअर बँकिंगचा अवलंब केला आहे. तसेच एटीएम (डेबिट कार्ड), पॉझिटिव्ह पे सिस्टीम, डिमांड ड्राफ्ट, आरटीजीएस, एनइएफटी, सीटीएस क्लिअरिंग, एस एम एस तसेच, मिस्ड कॉल इत्यादी सुविधा कार्यान्वित केल्या आहेत. बँकेच्या ठेवी व कर्ज योजनांचा बँकेचे सभासद, खातेदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील यांनी केले. (वाप्र)
फोटो :ॲड. उदयसिंह पाटील