आभाळमाया! कोयना धरण २५ टक्के भरले, सातारकरांना जोरदार पावसाची प्रतिक्षा

By नितीन काळेल | Published: July 6, 2024 06:53 PM2024-07-06T18:53:03+5:302024-07-06T18:54:28+5:30

नवजाला १०७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद 

Koyna Dam 25 percent full, needs heavy rain in Satara district | आभाळमाया! कोयना धरण २५ टक्के भरले, सातारकरांना जोरदार पावसाची प्रतिक्षा

आभाळमाया! कोयना धरण २५ टक्के भरले, सातारकरांना जोरदार पावसाची प्रतिक्षा

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कायम असून शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे १२९ तर नवजाला १०७ मिलीमीटर झाला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली असून साठा २७.२७ टीएमसी झाला आहे. परिणामी धरण २५ टक्के भरले आहे. तरीही धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून सुमारे ७८ टीएमसी पाण्याची गरज आहे.

जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आलातरी जिल्ह्यात अजून म्हणावे असे पर्जन्यमान झालेले नाही. पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. तर पश्चिमेकडे मागील आठवड्यापासून सतत पाऊस पडत असलातरी म्हणावा असा जोर नाही. कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, महाबळेश्वर या भागात दखल घेण्या इतपतच पाऊस पडत आहे. त्यातच पश्चिम भागात जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी यासारखे मोठे पाणी प्रकल्प आहेत.

धरणक्षेत्रातही पावसाची जेमतेम हजेरी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा अजून मोठ्या प्रमाणात वाढलेला नाही. मात्र, कोयना धरणक्षेत्रात सतत पाऊस असल्याने १५ दिवसांत १२ टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढलेला आहे. हे धरण पूर्ण भरण्यासाठी मोठ्या आणि संततधार पावसाची आवश्यकता आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १२९ तर जूनपासून आतापर्यंत १ हजार ३६१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला आतापर्यंत १ हजार ४५४ मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरला २४ तासांत अवघा ५९ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. तर या पावसाळ्यात आतापर्यंत महाबळेश्वरला १ हजार १८८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास सुमारे कोयनेत २२ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊन २७.२७ टीएमसी झाला होता. २५.९१ अशी टक्केवारी झालेली आहे. त्यातच शनिवारीही पश्चिम भागात पाऊस पडत होता. यामुळे धरणातील पाणीसाठा लवकरच ३० टीएमसीची टप्पा पार करु शकतो.

साताऱ्यात उघडझाप सुरू..

सातारा शहरात पाच दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. बुधवारी जोरदार पाऊस झाल्यानंतर तीन दिवसांत हलक्या सरी पडल्या. तर शनिवारी सकाळी हलका पाऊस झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी बारानंतर रिमझिम पावसाला सुरूवात झाली. तरीही जुलै महिना सुरू झाला असलातरी सातारा शहरात अजुन म्हणावा असा पाऊस पडलेला नाही.

Web Title: Koyna Dam 25 percent full, needs heavy rain in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.