कोयना धरण ९९ टक्के भरले, पाणीसाठा १०४ टीएमसीवर! 

By नितीन काळेल | Published: September 2, 2024 06:59 PM2024-09-02T18:59:08+5:302024-09-02T18:59:22+5:30

महाबळेश्वर १९, नवजाला २७ मिलिमीटर पाऊस 

Koyna Dam 99 percent full, water storage at 104 TMC!  | कोयना धरण ९९ टक्के भरले, पाणीसाठा १०४ टीएमसीवर! 

कोयना धरण ९९ टक्के भरले, पाणीसाठा १०४ टीएमसीवर! 

लोकमत न्यूज नेटवर्क 
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडतच असून २४ तासांत महाबळेश्वरला १९ तर नवजा येथे २७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेतही पाण्याची सावकाश आवक असलीतरी पाणीसाठा १०४ टीएमसीवर गेला. त्यामुळे धरण ९९ टक्के भरले भरले आहे. तसेच इतर धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.
जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे. जूनमध्ये चांगला पाऊस झाला. तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. सर्वच धरणे ८० टक्क्यांवर भरली. पूर्व भागात मागील वर्षभर दुष्काळ होता. सततच्या पावसामुळे तलाव आणि धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. आॅगस्ट महिन्यातही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे दुष्काळाचे सावट दूर झालेले आहे.

पश्चिम भागात मागील १५ दिवसांपासून पाऊस होत आहे. सुरूवातीला जोरदार पाऊस झाला. त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला आहे. तरीही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत. सध्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या प्रमुख धरणांत १४६ टीएमसीवर पाणीसाठा गेलेला आहे. त्यातच सध्या पाऊस होत असल्याने धरणात आवक होत आहे. त्यामुळे पाणी विसर्ग करावा लागतोय.

सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे २७ आणि महाबळेश्वरला १९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर एक जूनपासून सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ५ हजार ८९२ मिलीमीटरची झाली. यानंतर महाबळेश्वरला ५ हजार ६७५ आणि कोयनानगर येथे ५ हजार ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४ हजार ६०७ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात १०४. ०६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण ९८.८७ टक्के भरले आहे.

Web Title: Koyna Dam 99 percent full, water storage at 104 TMC! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.