कोयना धरणात सध्या ८५ टीएमसी साठा; सिंचनावर होणार परिणाम, वीजनिर्मितीलाही फटका

By नितीन काळेल | Published: November 22, 2023 07:10 PM2023-11-22T19:10:29+5:302023-11-22T19:11:03+5:30

कोयना धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन पाणी योजना अवलंबून आहेत. यामधील टेंभू योजनेचे पाणी साताऱ्यासह सांगली आणि साेलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते.

Koyna Dam currently holds 85 TMC; Irrigation will be affected, power generation will also be affected | कोयना धरणात सध्या ८५ टीएमसी साठा; सिंचनावर होणार परिणाम, वीजनिर्मितीलाही फटका

कोयना धरणात सध्या ८५ टीएमसी साठा; सिंचनावर होणार परिणाम, वीजनिर्मितीलाही फटका

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयनेत पावसाळ्यात अवघा ९४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यामुळे सुमारे ६० वर्षांच्या इतिहासात धरण नवव्यांदा भरलेले नाही. त्यातच सध्या धरणात ८५ टीएमसीवर पाणीसाठा आहे. त्यामुळे तरतुदीप्रमाणे सिंचन आणि वीज निर्मितीला पाणी कमी पडणार आहे. परिणामी या दोन्हींवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पाटण तालुक्यात कोयना नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते. तसेच राज्यातील मोठ्या धरणांपैकी हे एक आहे. या धरणाची पूर्वी पाणीसाठवण क्षमता ९८.८८ टीएमसी होती. त्यानंतर क्षमता वाढविण्यात आल्याने २००६ पासून धरणात १०५.२५ टीएमसी एवढा पाणीसाठा होऊ लागला आहे. या धरणक्षेत्रात दरवर्षी सरासरी पाच हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान होते. त्यामुळे धरणात पाण्याची आवक होत असते. मात्र, यंदा पर्जन्यमान कमी झालेले आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर झालेला आहे. यंदा धरण भरलेच नाही. सध्या तर धरणात ८५.६० टीएमसीच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीवरही परिणाम होऊ शकतो.

कोयना धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा होत आहे. त्यातील ६७.५ टीएमसी पाणी हे वीजनिर्मितीसाठी राखीव आहे. तर सिंचनासाठी ५५ टीएमसी पाण्याची तरतूद आहे. सिंचनासाठीचे पाणी पावसाळ्यातील विसर्ग धरून आहे. यंदा मात्र, धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने सिंचन आणि वीजनिर्मितीवरही परिणाम होण्याची भीती आहे. यासाठी लवकरच धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी किती पाणी राहणार हे निश्चित करण्यात येणार आहे. तर यापूर्वीही आठवेळा धरण भरले नव्हते. त्यातील २०००, २००१ आणि २००३ या वर्षात धरणात कमी पाणीसाठा होता.

कोयना धरण भरले नाही...

वर्ष             पाणीसाठा
१९६८             ९४.२०

१९७२             ८९.६९
१९८७             ९१.२३

१९९५             ७६.२९
२०००             ८७.१५

२००१             ८८.२२
२००३             ९३.५५

२०१५             ७८.७४
२०२३             ९२.९१

काेयनेवर तीन सिंचन योजना अवलंबून...

कोयना धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन पाणी योजना अवलंबून आहेत. यामधील टेंभू योजनेचे पाणी साताऱ्यासह सांगली आणि साेलापूर जिल्ह्यातील सिंचनासाठी जाते. तर ताकारी आणि म्हैसाळ या योजना सांगली जिल्ह्यातील मोठ्या आहेत. त्यासाठीही कोयनेतील पाण्याची तरतूद आहे.

सांगलीसाठी दोनवेळा पाणी सोडले...
सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे सांगलीच्या जलसंपदा विभागाकडून कोयनेतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आलेली. परिणामी मागील दोन महिन्यात दोनवेळा सांगली जिल्ह्यातील कोयनेतून पाणी सोडण्यात आले. यापुढेही सांगलीकडून मागणी वाढणार आहे. त्यामुळे पाणी सोडावे लागणार आहे.

Web Title: Koyna Dam currently holds 85 TMC; Irrigation will be affected, power generation will also be affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण