कोयनेतून बारा हजार क्युसेक पाणी सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 11:18 AM2018-08-13T11:18:28+5:302018-08-13T11:32:42+5:30
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने यंदा महिन्याच्या फरकाने दुसऱ्यांदा कोयनेचे दरवाजे उघडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली आहे.
पाटण (सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने यंदा महिन्याच्या फरकाने दुसऱ्यांदा कोयनेचे दरवाजे उघडण्याची वेळ धरण व्यवस्थापनावर आली आहे. कोयना जलाशयाचा पाणीसाठा सोमवारी (13 ऑगस्ट) सकाळी ९८.७८ टीएमसी झाला आहे. धरणात पाण्याची आवक २१ हजार २५५ क्युसेक होत आहे. त्यामुळे दुपारी एकनंतर धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.
धरण परिसरात पन्नास दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरण परिचलन सूचीनुसार दुपारी एक नंतर परिस्थितीनुसार धरणातून एकूण बारा हजार क्युसेक विसर्ग करण्यात येईल. वक्री दरवाजे किमान तीन फुटांनी उचलण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासांत ७५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. आज त्या भागात ४ हजार ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला चोवीस तासांत ७५ व आज ४ हजार १४६ मिलीमीटर तर महाबळेश्वरला चोवीस तासांत ५८ तर आज ३ हजार ६१३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.