Satara: कोयनेचे दरवाजे आठ फुटांवर; कण्हेर, उरमोडीतून पाण्याचा विसर्ग बंद
By नितीन काळेल | Published: August 5, 2024 06:43 PM2024-08-05T18:43:20+5:302024-08-05T18:43:48+5:30
महाबळेश्वरला १२० मिलिमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील घाटमाश्यावर पाऊस कमी झाला आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकवर परिणाम झाल्याने कण्हेर आणि उरमोडीच्या दरवाजातील विसर्ग पूर्ण बंद करण्यात आला आहे. तर कोयना धरणाच्या दरवाजातील विसर्ग ५० हजारांवरुन ४० हजारांपर्यंत कमी झाला असून दरवाजे आठ फुटांवर आहेत. यामुळे धरणातील पाणीपातळीत वाढ होणार आहे. तर २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक १२० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात मागील तीन आठवड्यापासून दररोज पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे पश्चिमेकडील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणांतील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला. धरणे लवकरच ८० टक्क्यांवर गेली. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वच प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. त्यातच रविवारपासून पश्चिमेकडील घाटमाथा परिसरात पावसाची उघडझाप सुरू झाली आहे. यामुळे धरणांतही पाण्याची आवक सावकाश आहे. यासाठी धरण व्यवस्थापनांनी धरणातील विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९३ तर नवजाला ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४ हजार १२१, नवजा येथे ४ हजार ७७३ तर महाबळेश्वरमध्ये ४ हजार ५७१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असला तरी प्रमाण कमी आहे.
धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. सकाळच्या सुमारास ४५ हजार ६११ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. यामुळे धरणातील विसर्ग कमी करण्यात आला. दुपारी बाराच्या सुमारास सहा दरावाजातून ४० हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात आले. तसेच पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक वेगाने पाणी सुरूच आहे. त्यामुळे धरणातून एेकूण ४२ हजार १०० क्यूसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात आहे.
धोममधून विसर्ग कमी..
वाई तालुक्यात धोम धरण आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला असल्याने आवकवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोमवारी सकाळच्या सुमारास दरवाजा आणि विद्युतगहातून होणारा विसर्ग ६ हजारवरुन एक हजार ६० क्यूसेक करण्यात आलेला आहे. तरीही पावसाचे प्रमाण पाहून आवक कमी किंवा अधिक करण्यात येणार आहे, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
कण्हेरमधून ३८० क्यूसेक..
सातारा तालुक्यातील कण्हेर धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग करण्यात येत होता. पण, सध्या पाऊस कमी झाल्याने सांडव्यातून विसर्ग बंद करण्यात आला आहे. सकाळच्या सुमारस विद्युतगृहातूनच ३८० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते.
उरमोडीतून ४५० क्यूसेक विसर्ग..
उरमोडी धरणाच्या सांडव्यातीलही विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या विद्युतगृहातून ४५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. पाण्याची आवक पाहून विसर्गाबाबत निर्णय घेतला जाईल, असे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.