Satara: कोयना धरण आजअखेर ५२ वेळा भरले काठोकाठ!, धरणाला ६१ वर्ष पूर्ण
By संजय पाटील | Published: August 2, 2023 12:18 PM2023-08-02T12:18:18+5:302023-08-02T12:18:50+5:30
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणा विषयी संपुर्ण माहिती वाचा एका क्लिकवर
संजय पाटील
कऱ्हाड : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची उभारणी १९६१ मध्ये झाली. गत साठ वर्षांहून अधिक काळापासून हे धरण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्रप्रदेशची तहान भागवत आहे. त्यातच उभारणीपासून आजअखेर तब्बल ५२ वेळा हे धरण काठोकाठ भरले आहे. तर नऊवेळा साठवण क्षमतेपेक्षा पाणीसाठा कमी राहिला.
कोयना धरणाला ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या बासष्ठावे वर्ष सुरू आहे. उभारणीपासून या धरणाने तब्बल ६१ पावसाळे पाहिले आहेत. त्यापैकी बावन्न पावसाळ्यांमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले. तर नऊवेळा साठवण क्षमतेपेक्षा धरणातील पाणीसाठा कमी राहिला. मात्र, तरीही उपलब्ध पाण्यात सिंचनासह विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात व्यवस्थापन यशस्वी ठरले. आजवर या धरणाने राज्य प्रकाशमान करण्याबरोबरच आसपासच्या राज्यांची तहान भागविली आहे. अतिवृष्टीच्या काळात तुडुंब जलाशय आपल्यात सामावून घेतला आहे. तसेच भूकंपाचे लाखो धक्के सहन करीत धरण भक्कमपणे उभे आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल का, याची चिंता लागून राहते. धरण भरले नाही तर सिंचनासह वीज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धरण भरावे, यासाठी व्यवस्थापनाला अचूक नियोजन करावे लागते. पावसाचा अंदाज घेत विसर्ग आणि साठा यावर नियंत्रण ठेवावे लागते. सध्या पावसाची संततधार असून येत्या काही दिवसात धरण काठोकाठ भरण्याची चिन्हे आहेत.
...यावर्षी पाणीसाठा कमी
१९६८ : ९४.०२०
१९७२ : ८९.५९७
१९८७ : ९१.२३६
१९८९ : ९८.९८३
१९९५ : ९५.७८९
२००० : ९२.३४६
२००१ : ९१.१२४
२००३ : ९३.२७१
२०१५ : ९४.३५०
पाणीसाठ्याचे नियोजन
६७.५० टीएमसी : वीज निर्मितीला
५.२५ टीएमसी : मृत पाणीसाठा
३२.५ टीएमसी : सिंचनासाठी
धरणाचा लेखाजोखा
तांत्रिक वर्ष : १ जून ते ३१ मे
साठवण क्षमता : १०५.२५ टीएमसी
सद्यस्थितीत साठा : ७४.२२ टीएमसी
ओलिताखाली क्षेत्र : १२.२३ हजार हेक्टर
... अशी झाली उभारणी
प्रशासकीय मान्यता : सन १९५४
कामाला सुरुवात : १९ जानेवारी १९५४
पाणी अडविण्यास सुरुवात : सन १९६१
धरणाचे उद्घाटन : १६ मे १९६२
धरणाचे काम पूर्ण : सन १९६३
प्रारंभीची क्षमता ९८.७८ टीएमसी
कोयना धरणाची उभारणी झाल्यानंतर सुरुवातीची साठवण क्षमता ९८.७८ टीएमसी होती. २००३ सालापासून साठवण क्षमतेत वाढ होऊन ती १०५.२५ टीएमसी झाली.