कोयना धरण अखेर ‘फुल्ल’, विसर्ग सुरूच; सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला
By दीपक शिंदे | Published: September 21, 2022 04:36 PM2022-09-21T16:36:25+5:302022-09-21T16:37:04+5:30
कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
कोयनानगर (सातारा): महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण आज, बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शंभर टक्के भरले. तसेच धरणात पाण्याची आवक सुरूच असल्यामुळे दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडून नदीपात्रात प्रतिसेकंद १० हजार ५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
कोयना धरण बुधवारी दुपारी बारा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. धरणाचा पाणीसाठा १०५.२५ टीएमसी झाला आहे. पाणीपातळी २१६३.०६ फूट झाली असून, सप्टेंबर महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळेच ११ सप्टेंबरपासून पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. अजूनही तो विसर्ग सुरूच आहे; तर १३ सप्टेंबर रोजी सहा वक्री दरवाजे उघडून विसर्ग वाढविण्यात आला होता. त्यामध्ये वारंवार बदल करून पाणीपातळी नियंत्रित करण्यात आली.
आज, पुन्हा दुपारी २ वाजता सहा वक्री दरवाजे एक फुटाने उघडून ९४६३ क्युसेक व पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक असा कोयना नदीपात्रात एकूण १० हजार ५१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने कोयना नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला...
कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे महाराष्ट्रातील वीजनिर्मिती व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील बहुतांशी भागाचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या धरणातील पाणीसाठ्यावर या तिन्ही राज्यांचे लक्ष लागून असते. धरण पूर्ण क्षमतेने भरले की त्याचा तिन्ही राज्यांना फायदा होत असतो.