दुसऱ्या राज्यांना पाणी देण्यासारखी नाही कोयना धरणाची स्थिती, केवळ 'इतकाच' पाणीसाठा शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 12:03 PM2023-06-02T12:03:50+5:302023-06-02T12:04:38+5:30
तांत्रिक वर्ष सुरू झाल्याने कराराप्रमाणे राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते
कोयनानगर : कोयना धरणातूनपाणी मिळावे, अशी मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र, कोयना धरणात केवळ १८ टीएमसी पाणीसाठा असल्याने कोयनेतून कर्नाटकला पाणी देण्यासारखी स्थिती नाही. मात्र, तांत्रिक वर्ष सुरू झाल्याने कराराप्रमाणे राज्य सरकार याबाबत निर्णय घेऊ शकते.
सध्या कोयनेतून ३,१४० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी सांगली जिल्ह्याच्या मागणीनुसार सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. मात्र, अतिरिक्त पाणी सोडावे लागल्यास आणि पाऊसकाळ लांबला तर पाण्याची टंचाई जाणवणार आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांसाठी वरदायिनी ठरलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या सन २०२३-२४ च्या तांत्रिक वर्षास १ जूनपासून सुरुवात झाली. ३१ मे रोजी संपलेल्या तांत्रिक वर्षात कोयना जलविद्युत प्रकल्पातून ३३६१.८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे.
कोयना धरणाचे पाणीवाटप कृष्णा लवादानुसार १ जून ते ३१ मे या तांत्रिक वर्षानुसार होत असते. कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. यामधील ६७.५० टीएमसी पाणी वीजनिर्मिती व उर्वरित सिंचनासाठी वापरले जाते. चालू वर्षी ६७.५० टीएमसी पाणी या लवादाच्या आरक्षित पाणीसाठ्याची मर्यादा ओलांडत तब्बल ७१.०९ टीएमसी पाण्याचा वापर पश्चिमेला वीजनिर्मितीसाठी करण्यात आला.
सध्या १८.०९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, मृतसाठा ५.१२ टीएमसी वगळता १२.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी निव्वळ पाणीसाठा १६.२० टीएमसी इतका होता. गतवर्षीच्या तांत्रिक वर्षांची तुलना केली असता पाणीसाठा कमी आहे. मात्र, सध्या सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे दीड महिना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याचे सांगितले जाते.