पावसाची उघडीप; कोयना धरण भरण्यास लागणार उशिर
By नितीन काळेल | Published: August 7, 2023 01:01 PM2023-08-07T13:01:27+5:302023-08-07T13:02:43+5:30
महाबळेश्वरला १० मिलीमीटरची नोंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची उघडीप असल्याने धरणातील पाणीसाठ्यावरही परिणाम झाला आहे. त्यामुळे कोयना धरण भरण्यास यंदा उशिर लागू शकतो. सध्या धरणात ८२ टीएमसीवर पाणीसाठा आहे. तर २४ तासांत महाबळेश्वरला फक्त १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरूवात झाली. पश्चिम भागात सवा महिना पाऊस पडत होता. त्यातील १५ दिवस संततधार होती. त्यामुळे कास, तापोळा, बामणोली, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरातील जनजीवनावर परिणाम झालेला. तसेच पश्चिमेकडीलच धोम, कोयना, बलकवडी, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे आज ही धरणे ७० टक्क्यांवर पोहोचलीत.
पण, गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी होत गेला. तर सध्या पावसाची उघडीप आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला अवघा १२ तर नवजाला १३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर महाबळेश्वरलाही १० मिलीमीटर पाऊस झाला आहे. एक जूनपासूनचा विचार करता सर्वाधिक पाऊस हा नवजाला ४४२० मिलीमीटर पडला. तर कोयनानगर येथे ३११२ आणि महाबळेश्वरला ४०७७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
पावसाची उघडीप असल्याने धरणातही कमी प्रमाणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. कोयनाक्षेत्रातही तुरळक पाऊस होत असून सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ९ हजार ८६० क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणपाणीसाठा ८२.१६ टीएमसी झाला होता. त्याचबरोबर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, पश्चिम भागात पावसाची उघडीप असल्याने नद्यांच्या पाणीपातळीतही उतार आलेला आहे.
कोयनेत गतवर्षी ६७ टीएमसी पाणीसाठा...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले आहे. गेल्यावर्षी ७ आॅगस्टपर्यंत कोयना येथे अवघा २४४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर नवजाला ३१८९ आणि महाबळेश्वरला ३२१३ मिलीमीटर पाऊस पडलेला. तर कोयना धरणात ६७.५७ टीएमसी पाणीसाठा होता. यंदा कोयना धरणात अधिक पाणीसाठा आहे.