कोयना धरणाने गाठली पन्नाशी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:24 AM2021-07-19T04:24:49+5:302021-07-19T04:24:49+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून पाऊस सुरूच असून, रविवारी सकाळपर्यंत नवजाला सर्वाधिक ७२ मिलीमीटरची नोंद झाली. तर ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यापासून पाऊस सुरूच असून, रविवारी सकाळपर्यंत नवजाला सर्वाधिक ७२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात ५० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. तसेच धरणात पाण्याची आवक टिकून आहे.
जिल्ह्यात जवळपास २० दिवसांच्या खंडानंतर मागील आठवड्यात पाऊस सुरू झाला आहे. हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होत आहे. या पावसामुळे पश्चिमेकडे भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. तसेच प्रमुख धरणातील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे.
रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात नवजा येथे सर्वाधिक ७२ मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत तेथे १७२६ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर कोयनेला ४० व जून महिन्यापासून १२६३ मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ५५ आणि यावर्षी आतापर्यंत १७६२ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. रविवारी सकाळी कोयना धरणात ५०.०४ टीएमसी पाणीसाठा झालेला. तर शनिवारी ४८.४८ टीएमसी साठा होता. कोयना धरणात २४ तासात दीड टीएमसीहून अधिक पाणी वाढले. त्याचबरोबर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक चांगली आहे. सकाळच्या सुमारास १७५५५ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.
जिल्ह्यातील धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरण परिसरातही पाऊस होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. पूर्व दुष्काळी भागात कधीतरी पावसाची एखादी सर पडत आहे. अजूनही ओढ्यांना पाणी नाही. छोटे पाझर तलाव कोरडे पडलेले आहेत. माण, खटाव, फलटण तालुक्यांत मोठ्या पावसाची आवश्यकता कायम आहे.
.........................................................