पूर व्यवस्थापनासाठी कोयना धरण सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:35+5:302021-07-23T04:23:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोयनानगर : कोयना धरणाची साठवण क्षमता १०५ टीएमसी असली तरी बहुतांशवेळा अतिवृष्टी होऊन धरणातून पाणी सोडण्याची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोयनानगर : कोयना धरणाची साठवण क्षमता १०५ टीएमसी असली तरी बहुतांशवेळा अतिवृष्टी होऊन धरणातून पाणी सोडण्याची वेळ येते. त्यावेळी धरणातून सोडलेले पाणी आणि अतिवृष्टीमुळे ओढे, नाले आणि उपनद्यांचे नदीत मिसळणारे पाणी यामुळे पूरस्थिती निर्माण होते. पूर टाळण्यासाठी सध्या कोयना धरण सज्ज झाले असून, सर्व यंत्रणा सतर्क आहे.
राज्यात मान्सून सक्रिय झाला असून, कोकण किनारपट्टीसह पश्चिम घाटात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावले असले, तरी कृष्णा, कोयनेसारख्या मुख्य नद्यांना येणाऱ्या पुरामुळे होणारे नुकसान टाळले जावे, अशी सामान्यांची अपेक्षा असते. निसर्गसंपन्न सह्याद्री घाटामध्ये पर्जन्यमानाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून नदीपात्रात पाणी सोडणे अपरिहार्य असते. सखल भाग आणि कमी उतार या वैशिष्ट्यांमुळे पाणी सोडल्यानंतर नदीपात्राच्या रुंदीत वाढ होते. अशावेळी धरणाच्या आणि धरणाखालील नदीच्या पाणलोट क्षेत्रात एकाचवेळी अतिवृष्टी झाल्यास नदीला पूर येण्याची शक्यता वाढते.
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटामध्ये कोयना धरण हे एक महत्त्वाचे व मोठे धरण आहे. या धरणाचा मुख्य उद्देश वीजनिर्मिती आणि सिंचन हा आहे. तथापि, आपत्कालिन परिस्थितीमध्ये धरणाद्वारे काही प्रमाणात पूर नियंत्रण करण्याचा प्रयत्न होतो. यंदाही संभाव्य पुराचे गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागाने पूर व्यवस्थापनाचे काटेकोर नियोजन केले आहे.
- चौकट
१ जूनपासूनच कक्ष कार्यान्वित
कोयना धरणावरील पूर नियंत्रण कक्ष दि. १ जूनपासून कार्यान्वित करण्यात आला असून, दिवस-रात्र तीन शिफ्टमध्ये जलसंपदा विभागातील स्थापत्य, यांत्रिकी आणि विद्युत विभागाचे प्रशिक्षित कर्मचारी व तंत्रज्ञ नियुक्त करण्यात आले आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमान, धरणाची पाणी पातळी व पाणीसाठा याची माहिती स्वयंचलित यंत्राद्वारे उपग्रहामार्फत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जात आहे.
- चौकट
... अशी आहे यंत्रणा
धरण माथ्यावर तसेच पूर नियंत्रण कक्षामध्ये वायरलेस यंत्रणा व सॅटेलाईट फोनद्वारे संपर्क यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. धरणातील येवा सातत्याने मोजण्यासाठी व आवश्यकतेनुसार मोजका विसर्ग नदीमध्ये सोडून पूर नियंत्रण करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली चार अनुभवी अभियंत्यांचे पथक पूर्णवेळ नियुक्त करण्यात आले आहे.
- चौकट
पूर नियंत्रण कक्षाद्वारे पूर्वसूचना
धरणामधून नदीपात्रात विसर्ग सोडण्यापूर्वी पूर नियंत्रण कक्षाद्वारे जलसंपदा विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात येते. ज्यामुळे आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक उपाययोजना तत्काळ कार्यान्वित करणे शक्य होईल.
फोटो : २२ केआरडी ०४
कॅप्शन : प्रतिकात्मक