कोयना धरण अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:39+5:302021-07-17T04:29:39+5:30
महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा राज्याच्या नजरा लागून असलेल्या कोयना धरणात जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, तरी पन्नास टीएमसी पाणीसाठा ...
महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा राज्याच्या नजरा लागून असलेल्या कोयना धरणात जुलै महिन्याचा पहिला पंधरवडा संपला, तरी पन्नास टीएमसी पाणीसाठा झाला नाही. धरण पूर्ण भरण्यासाठी अजून ५८ टीएमसी पाण्याची गरज आहे. सन २०२१-२२ च्या तांत्रिक वर्षातील दीड महिन्याचा कालावधी संपला आहे. जून महिन्यातील चार दिवसांतील अतिवृष्टीचा पाऊस वगळता, आजपर्यंत पावसाची उघडझापच सुरू आहे. जून महिन्याअखेर कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात १३ टीएमसीने वाढ होत पाणीसाठा ४२,५२ टीएमसी इतका झाला होता. जूनच्या शेवटच्या व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उसंत घेतल्याने पाणीसाठ्यात घट होत आहे. दि. ८ जुलैपर्यंत ४१.१९ टीएमसीवर पोहोचला होता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातील दमदार पावसाने दि. १६ जुलैपर्यंत पाणीसाठ्यात तब्बल सहा टीएमसीने वाढ होत पाणीसाठा ४७.२० टीएमसी झाला. पावसाचे प्रमाण व आवक स्थिर राहिली, तर दोन दिवसांत धरणातील पाणीसाठा पन्नास टीएमसी होईल.
कोयना भागात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने सुरुवात केल्याने रखडलेल्या भात नाचणी लावणीच्या कामांना वेग आला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजताच्या आकडेवारीनुसार कोयना धरणातील पाणीसाठा ४७.२० टीएमसी झाला आहे. धरणातील पाण्याची आवक १८,०७० क्युसेक्सने सुरू आहे. दि. २९ जूनपासून पूर्वेकडील पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग पूर्ण बंद आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस असा : कोयना २३/११९८, नवजा ७०/१५९६, महाबळेश्वर ५७/१६६६ पर्जन्यमापकावर नोंद झाली आहे
चौकट
मागील काही वर्षांतील अर्धशतकी पाणीसाठा
२०१५ - २८ जून
२०१६ - १८ जुलै
२०१७ - १८ जुलै
२०१८ - ११ जुलै
२०१९ - २१ जुलै
२०२० - २४ जुलै