कोयना धरण पाणीसाठ्यात 5 टीएमसीने वाढ, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पावसाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 11:54 AM2022-07-14T11:54:21+5:302022-07-14T11:54:58+5:30
महाबळेश्वरमध्ये विक्रमी 270 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
प्रमोद सुकरे
कराड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. गेल्या चोवीस तासात झालेल्या उच्चांकी पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल 5 टीएमसीने वाढ झाली आहे. एका दिवसात 4.70 टीएमसी पाण्याची आवक झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा 43.18 टीएमसी झाला आहे. तर महाबळेश्वरमध्ये विक्रमी 270 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पाटण तालुक्यातील कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 55,182 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. वाढलेली आवक आणि पावसाचा जोर पाहता कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचा पायथा वीजगृहातून काल, बुधवारी (दि.13) सायंकाळी 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. अतिवृष्टीचा इशारा आणि वाढती आवक पाहता पायथा वीजगृहातील विसर्ग आणखी वाढू शकतो.
गेल्या 24 तासात धरण पाणलोट क्षेत्रातील महाबळेश्वर येथे विक्रमी 270 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरनंतर नवजा येथे 121 मिलीमीटर आणि कोयनानगर येथे 112 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सध्या 43.18 टीएमसी आणि पाणी पातळी 2099 फूट इतकी झाली आहे.
प्रशासन सतर्क
हवामान विभागाने सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापन आणि सातारा जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत देखील वाढ होऊ शकते. तसेच धोकादायक भागांवर लक्ष ठेवण्यात आला आहे. भुस्खलनाची शक्यता असणार्या ठिकाणच्या नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यावर प्रशासनाचा भर दिसत आहे.