‘कोयना’च्या अभियंत्यांना पावसाने चकविले !

By admin | Published: September 19, 2016 10:58 PM2016-09-19T22:58:42+5:302016-09-20T00:08:42+5:30

नियोजन फसले : पाणी सोडल्याने ऊस शेती पाण्यात; कृषिपंप गेले वाहून...

'Koyna' engineers were punished by rain! | ‘कोयना’च्या अभियंत्यांना पावसाने चकविले !

‘कोयना’च्या अभियंत्यांना पावसाने चकविले !

Next

पाटण : कोयना नदीने पुन्हा रौद्ररूप धारण केल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांची ऊस शेती पाण्यात तर कृषिपंपाच्या मोटारींही वाहून गेल्या. एवढेच काय नदीकाठी केलेल्या अंत्यसंस्कारानंतर सारेच वाहून गेल्याने रक्षाविसर्जनासाठीही रक्षा उरली नाही. हे सारे कोयना धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करून ठेवण्याच्या उद्दीष्टामुळेच ही वेळ आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी असून, गेल्या वर्षी कमी पाऊस झाला. धरण ८० टक्केच भरले आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे हे धरण अगदी काठोकाठ भरून ठेवायचे ठरले.
यंदा केवळ चांगलाच पाऊस झाला नसून आतापर्यंत पाच हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्यंतरी ६ आॅगस्ट रोजी पावसाच्या भीतीने ७ आॅगस्ट रोजी कोयना धरण व्यवस्थापनच्या अभियंत्यांना धरणात ८७ टीएमसी पाणी असताना धरणाचे दरवाजे दोन फुटाने उचलून पाणी सोडावे लागले. कारण भविष्यात पावसाचा जोर वाढला तर धरणातील पाणीसाठा नियंत्रित राहावा. नदीकाठच्या गावांना पुराचा तडाका बसू नये, हीच भावना होती. मात्र पाणी सोडले आणि पाऊस थांबला. त्यामुळे लगेच कोयनेची दारे बंद करावी लागली.
त्यानंतर धरणात १०४ टीएमसी पाणीसाठा होईपर्यंत महिनाभराची वाट पाहावी लागली. त्यासाठी पायथा किंवा धरणाच्या दरवाजाद्वारे पाण्याचा एकही थेंबही जाऊ दिला नाही. अखेर कोयना धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले. पायथ्यातून वीजनिर्मिती करून पाण्याचा विसर्ग २,१११ क्युसेक करण्यास सुरुवात केली.
अनंत चतुर्थीनंतर परतीच्या पावसाचा जोर वाढला. मग आता काय करायचे? धरण तुडुंब भरलेले होते आणि वरून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षणीय वाढली. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे चार फुटांनी उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला. त्यानंतर २४ तासांत दरवाजे सहा फुटांवर नेऊन तब्बल ५४,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविला. (प्रतिनिधी)

शेती गेली पाण्याखाली
एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे कोयना धरणापासून कऱ्हाडपर्यंतच्या नदीकाठच्या गावांमधील शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली. संगमनगर धक्का जुना पूल, मूळगाव पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे अनेक गावे व ग्रामस्थांचा संपर्क तुटला. कृष्णा नदीलाही पुराचे स्वरूप आल्याने सांगलीकडील गावेही पूरसदृश्य झाली.
कोयना धरण परिसरात अचानक तीनशे मिलिमीटर पाऊस झाला. त्याअगोदर धरणातून पाणी सोडणे योग्य नव्हते. कारण जर पाऊस झाला नसता तर धरण रिकामे करून चालणार नव्हते. तरीही आपण चार टप्प्यांत धरणातून पाण्याचा विसर्ग केला. एवढ्या प्रमाणात पाणी सोडण्यापूर्वी पूर्वसूचना देण्यात आली होती.
- ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन

Web Title: 'Koyna' engineers were punished by rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.