सातारा जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा; कोयना, महाबळेश्वरला गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 12:11 PM2024-09-25T12:11:19+5:302024-09-25T12:11:36+5:30
सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षीचा दुष्काळ पुसून काढत वरुणराजाने यंदा जोरदार बरसात केली. त्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत कोयनानगर येथे गतवर्षीच्या ...
सातारा : जिल्ह्यात गेल्या वर्षीचा दुष्काळ पुसून काढत वरुणराजाने यंदा जोरदार बरसात केली. त्यामुळे २४ सप्टेंबरपर्यंत कोयनानगर येथे गतवर्षीच्या तुलनेत १ हजार ४३४, तर नवजालाही १ हजार ४ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. तसेच महाबळेश्वरमध्येही मागील वर्षीपेक्षा यंदा अधिक पर्जन्यमान आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी होते. पश्चिम भागातील प्रमुख आणि मोठे पाणी प्रकल्पही भरले नव्हते. कोयनेसारख्या १०५ टीएमसीच्या धरणातही जेमतेम पाणीसाठा झालेला आहे. ९५ टक्क्यांपर्यंतच धरण भरलेले. तर इतर धरणेही पूर्ण भरलेली नव्हती. परंतु, यावर्षी जिल्ह्यावर वरुणराजाची कृपा झाली आहे.
मागीलवर्षी २४ सप्टेंबरपर्यंत कोयनेला ३ हजार ९१४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली. पण, यंदा आतापर्यंत ५ हजार ३४८ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. नवजालाही गतवर्षी ५ हजार ५३५ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी आतापर्यंत तब्बल ६ हजार ५३८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. महाबळेश्वरलाही गतवर्षीपेक्षा ८८२ मिलिमीटर पाऊस अधिक झाला. आतापर्यंत ६ हजार २०४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर कोयना धरणातही अधिक पाणीसाठा आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीपेक्षा सुमारे ११ टीएमसी साठा अधिक आहे. यावर्षी ४ सप्टेंबरलाच कोयना धरण पूर्ण भरले होते.
पश्चिम भागात पावसाची उघडझाप..
जिल्ह्याच्या पूर्व भागात चांगलाच पाऊस होऊ लागला आहे. पण, पश्चिमेकडे उघडझाप आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर आणि नवजाला अवघा एक तर महाबळेश्वरमध्ये ४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले होते. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक बंद झाली आहे. तर धरणातील विसर्ग पूर्णपणे थांबविण्यात आलेला आहे.