कोयना, नवजा, महाबळेश्वरच्या पावसाचा शंभरीचा टप्पा पार; यंदा पावसाचे प्रमाण कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 07:24 PM2022-06-24T19:24:31+5:302022-06-24T19:24:53+5:30
मान्सूनचा पाऊसही नेहमीपेक्षा चार दिवस उशिरा दाखल झाला. तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे
सातारा : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असलातरी पाऊस कमी आहे. जूनपासून आतापर्यंत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसाने १०० मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. पण, गतवर्षीपेक्षा कमी आहे. गेल्यावर्षी जूनच्या उत्तरार्धात जोरदार पाऊस सुरू होता. तसेच पेरण्यांना वेग आला होता.
जिल्ह्यात यावर्षी उन्हाळी पाऊस कमी झाला. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही नेहमीपेक्षा चार दिवस उशिरा दाखल झाला. तरीही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांत चिंता निर्माण झाली आहे. मागील वर्षीचा विचार करता पाऊस वेळेवर सुरू झाला. तसेच पेरणीलाही वेग आला होता. गतवर्षी जून महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पश्चिम भागातील धरणे, तलावातील साठ्यात वाढ झाली होती. यंदा मात्र, तलावातील साठा कमी आहे. आता जून महिना संपत आला तरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची चिन्हे नाहीत.
मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाची दडी होती. ती मागील चार दिवसांपर्यंत कायम होती. पण, रविवारनंतर पश्चिम भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली. पण, दोन दिवसांत जोर कमी झाला. त्याचबरोबर पूर्व भागात पाऊसच झालेला नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई जाणवणार आहे. त्याचबरोबर पेरणीचा खोळंबाही झाला आहे.
कोयनानगर येथे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद
जूनपासून कोयनानगर येथे १०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर नवजा येथे सर्वाधिक १४१ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला १०२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला १६, नवजा ९ आणि महाबळेश्वर येथे १२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे.