कोयना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन स्थगित नाही, तर...; भारत पाटणकरांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:53 PM2023-03-29T14:53:08+5:302023-03-29T14:53:23+5:30
मंत्री शंभुराज देसाई यांनी आंदोलनाला भेट देऊन महिनाभरात बैठकीचे पत्र देताना आंदोलन मागे घेण्याबाबत आवाहन केले होते
कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्तांनी गेली तीस दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे न घेता एक महिनाभर सुटी घेण्याचा निर्णय उपस्थित आंदोलकांनी हात वर करून घेतला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक न झाल्यास पुन्हा राज्यभर आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे डाॅ. भारत पाटणकर यांनी दिला आहे. कोयनानगर येथील शिवाजी क्रीडांगणावर २७ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या ठिय्या आंदोलनात ते बोलत होते.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला तीस दिवसांत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. मात्र २४ मार्चरोजी मंत्रालयात आयोजित केलेल्या प्रधान सचिव यांच्यासोबतच्या बैठकीत अनेक प्रश्नांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर ही बैठक प्रकल्पग्रस्तांसाठी महत्त्वाची ठरली. या बैठकीतील अनेक निर्णयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.
सोमवारी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आंदोलनाला भेट देऊन महिनाभरात बैठकीचे पत्र देताना आंदोलन मागे घेण्याबाबत आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी थोडासा बदल करत आंदोलन मागे न घेता एक महिनाभर आंदोलनाला सुटी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
डाॅ. पाटणकर म्हणाले, ‘सात लाख ३१२ प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रात आहेत. त्यांना उद्ध्वस्त करणारे कब्जे हक्कांची किंमत व मिळालेल्या जमिनीवर व्याज वसुलीचे शासन निर्णय होते. या दोन शासन निर्णय दुरूस्ती, इतर प्रकल्पांप्रमाणे कोयनेला नियोजन आराखडा, घर बांधणी अनुदान पात्र खातेदार, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे, तारळी प्रकल्पग्रस्तांच्या घराशेजारील गायरान व महसूल पड जमिनी देणे आदी निर्णय मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत होणार आहेत. यामुळे आंदोलनाला न आलेल्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे.
यावेळी दिलीप पाटील, शरद जांभळे, श्रीपती माने यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच संतोष गोटल, सचिन कदम, महेश शेलार, सीताराम पवार, बळीराम कदम, दाजी पाटील, परशुराम शिर्के, प्रवीण साळुंखे, अनिल देवरूखकर, राजाराम जाधव, आकाश कांबळे यांच्यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चर्चा करून काढला मध्य
आंदोलन सुरू की स्थगित करायचा याचा मध्य साधत निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून २७ एप्रिलपर्यंत आंदोलनाला सुटी आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक न झाल्यास सात लाख प्रकल्पग्रस्त महाराष्ट्रभर आंदोलन करतील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
प्रकल्पग्रस्तांच्या अडचणींबाबत मार्गदर्शन
आंदोलनाला सुटी असली तरी, प्रकल्पग्रस्त महिनाभर कोयना (पाटण), जामगाव (सातारा), कामथी (खटाव), वांग (कडेगाव), बामणोली, शिरोळ, हातकणंगले आदी ठिकाणी एकत्र येऊन आजवर झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी व प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणींबाबत मार्गदर्शन करणार आहेत.