कोयनेच्या सिंचन अन् वीजनिर्मिती पाणी वापराला कात्री; कमी पाणीसाठ्याचे कारण
By नितीन काळेल | Published: November 23, 2023 09:12 PM2023-11-23T21:12:25+5:302023-11-23T21:13:28+5:30
याबाबतची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
सातारा : जिल्ह्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने कोयना धरणही भरले नाही. त्यामुळे सिंचन आणि वीजनिर्मितीच्या नियोजित पाणी वापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. यामध्ये सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात असणार आहे. याबाबतची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, कोयना धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. मात्र, यावर्षी पावसाळी हंगामापूर्वी १ जून रोजी धरणात १७.६४ टीएमसी पाणीसाठा होता. तर यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पर्जन्यमानात ४४० मिलीमीटरची तूट आणि आवाकमध्येही ३९.७१ टीएमसी इतकी घट झाली. त्यातच १ जून ते १४ ऑक्टोबर या कालावधीत सिंचनासाठी ५.४६ आणि वीजनिर्मितीसाठी २३.०३ टीएमसी पाण्याचा वापर झालेला आहे. धरणामधून सिंचनासाठी ४२.७० टीएमसी वार्षिक पाणी वापराचे प्रकल्पीय नियोजन असते. यामधील दि. १ जुलै ते १४ ऑक्टोबरदरम्यान खरीप हंगामात ४.३९ टीएमसी पाणीवापराचे नियोजन आहे.
कोयना प्रकल्पांतर्गत बहुतांशी सिंचन क्षेत्र सांगली जिल्ह्यातच आहे. त्यामुळे सांगली सिंचन विभागाच्या मागणीनुसार धरणातून सिंचनासाठी विसर्ग करण्यात येतो. मागीलवर्षी खरीप हंगामात पाणीवापर ०.४७ टीएमसी इतका मर्यादित होता. मात्र, यावर्षी खरीपात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यादरम्यान सांगली सिंचनकडून मागणी करण्यात आली. त्यामुळे धरणातून २.३६ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. दुष्काळी स्थितीमुळे गतवर्षीपेक्षा २ टीएमसी जादा पाणी देण्यात आले आहे. त्यामुळे सध्या धरणातच पाणी कमी असल्याने याचा परिणाम रब्बी आणि उन्हाळी हंगाम सिंचनावर होणार आहे.
परिणामी पाणीसाठ्याच्या कमतरतेमुळे नियोजित पाणीवापरात ११.७१ टीएमसी कपात प्रस्तावित आहे. त्यापैकी सिंचनाच्या २.८६ आणि वीजनिर्मितीसाठी ८.८५ टीएमसी पाणी कपात प्रस्तावित आहे. त्यानुसार पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचन व वीजनिर्मितीसाठी एकूण ७० टीएमसी इतका मर्यादेत पाणीवापर करण्याबाबत सूचना केलेली आहे.
कोयना धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामामधील सिंचनासाठी अनुक्रमे २५.४५ आणि १२.४१ टीएमसी असे एकूण ३७.८६ टीएमसी पाणी वापर नियोजित आहे. मात्र, कपातीनुसार दोन्ही हंगामामधील पाणी वापर ३५ टीएमसी इतक्या मर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे. यामधून सातारा जिल्ह्यासाठी ३ आणि सांगली जिल्ह्यासाठी ३२ टीएमसी या मर्यादेत पाणीवापर होणार आहे.
मार्चमध्ये पाणी वापराचे फेरनियोजन...
कमी पर्जन्यमानामुळे धरणामधील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे पिण्यासह सिंचन व विजनिर्मितीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच पुढीलवर्षी जून व जुलै महिन्यात अपेक्षित पाणी आवक न झाल्यास पिण्यासह इतर आवश्यक गरजांसाठी धरणामध्ये किमान पाणीसाठा उपलब्ध राहण्यासाठी रब्बी हंगामातील प्रत्यक्ष पाणी वापर आणि धरणामधील शिल्लक पाणीसाठा याचा विचार करुन मार्चमध्ये उन्हाळी हंगामामधील पाणी वापराचे फेर नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली.