कोयनेचा शिवार अद्यापही जलमय, शेतकरी संकटात : पिकांचे अतोनात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 02:09 PM2020-11-02T14:09:18+5:302020-11-02T14:10:39+5:30
Koyna, farmar, rain, sataranews कोयना भागात गत पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. ओढे, नाले अद्यापही तुडुंब वाहत असून, शिवार जलमय आहे. या पावसाने काढणीस आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे पुन्हा पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी होत आहे.
कोयनानगर : कोयना भागात गत पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. ओढे, नाले अद्यापही तुडुंब वाहत असून, शिवार जलमय आहे. या पावसाने काढणीस आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे पुन्हा पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी होत आहे.
ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसाने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बहुतांशी पिके काढणीस आल्याने पावसाच्या माराने भुईसपाट झाली आहेत. तर काही ठिकाणी पिके झडायला सुरुवात झाली आहे. कापलेल्या पिकांच्या वैरणीचेही नुकसान झाले आहे. ऐन सुगीच्या दिवसात नुकसानकारक पावसाने शेतकरी अडचणीत आले आहेत.
कोयना भागात भात पिकाच्या कापणीचे काम जोरात असून, परतीच्या पावसाने या कामात व्यत्यय येत आहे. पावसाचा अंदाज घेत कापणी करावी लागत आहे. अचानक दुपारीच पाऊस सुरू झाला तर मोठी तारांबळ उडत आहे. दिवसभराचे काम पूर्ण होत नसल्याने दुसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांना पुन्हा तेच काम करावे लागत आहे. त्यामुळे दिवसही वाया जात असून, मजुरांना पूर्ण दिवसाची हजेरी द्यावी लागत आहे. काढणीयोग्य पीक आडवे होत झडून जात आहे.
विभागात १० ते १४ ऑक्टोबर या चार दिवसांतील अतिवृष्टी काळातील पंचनामे झाले आहेत. मात्र, त्यानंतर आजपर्यंत पावसाचे थैमान सुरूच आहे. पिकांचेही नुकसान होत आहे. तरी प्रशासनाने पुन्हा पंचनाम्यासाठी बांधांवर जाऊन पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.