‘कृष्णे’चा आज फैसला
By admin | Published: June 22, 2015 10:14 PM2015-06-22T22:14:10+5:302015-06-22T22:14:10+5:30
धाकधूक वाढली : तिन्ही पॅनेलचे समर्थक करताहेत विजयाचा दावा
कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी सरासरी ८० टक्के मतदान झाले. मंगळवार, दि. २३ रोजी येथील शासकीय गोदाममध्ये त्याची मतमोजणी होणार असून, तिन्ही पॅनेलच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. त्याचबरोबर उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ‘कृष्णे’चा फैसला निश्चित होईल.
कारखान्याच्या इतिहासात यंदा प्रथमच तिरंगी सामना पाहायला मिळाला. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल, डॉ. इंद्रजित मोहिते, मदनराव मोहिते यांचे रयत पॅनेल तर डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांचे सहकार पॅनेल असा सामना पाहायला मिळाला. सातारा, सांगली जिल्ह्यांतील पाच विधानसभा मतदारसंघांत कारखान्याचे सुमारे ४६ हजार सभासद विखुरल्याने गत महिनाभरात तिन्ही पॅनेलचे नेते व उमेदवारांनी पायात भिंगरी बांधून प्रचार केला.
नेत्यांच्या जाहीर सभांमधून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या, प्रचार गीते, ‘एलईडी’च्या हायटेक प्रचाराने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झाला. टोप्या, झेंडे, कापडी व प्लेक्स बोर्डमुळे कार्यक्षेत्रात एक वेगळाच माहोल तयार झाला होता.
शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या, चौकाचौकांत
लावलेले बोर्ड हटविण्यात आल्याने चौकांनी मोकळा श्वास घेतला. निवडणूक यंत्रणेने वेग घेतला. मतदान केंद्रांवर मतदान झाले. ४६ हजार
२९७ मतदारांपैकी ३७ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होणार असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकालाचे अंतिम चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.
दरम्यान, तिन्ही पॅनेलच्या समर्थकांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. प्रथमच तिरंगी लढत झाल्याने अंदाज बांधणे कठीण झाले
आहे.
समर्थक कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. ठिकठिकाणी निकाल काय लागणार याचीच चर्चा रंगली आहे. सभासदांव्यतिरिक्त इतर लोकांचीही निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (प्रतिनिधी)
अनेकांनी लावल्यात पैजा
निवडणुकीच्या निकालाबाबत अनेक तर्कविकर्त लढविल्या जात आहेत. कार्यकर्ते आपापल्या बुद्धीने मतांचा हिशोब मांडत आहेत. आम्हीच कसे जिंकणार, हे सांगत आहेत. त्यातूनच गावागावांत आणि कार्यकर्त्यांच्यात पैजा लागल्याचे चित्र आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण ४३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी ९० टेबल ठेवण्यात आले असून, एका टेबलवर १ पर्यवेक्षक, ३ सहायक कर्मचारी, १ शिपाई असे पाच कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना सोमवारी दुपारी प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
- राजेंद्र शेळके,
सहायक निवडणूक अधिकारी