कृष्णा, कोयनाकाठी महापुराचा विध्वंस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:32 AM2021-07-25T04:32:27+5:302021-07-25T04:32:27+5:30

कऱ्हाड : पावसाचा जोर मंदावला, धरणातील विसर्गही कमी करण्यात आला. त्यामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांचा महापूर आता ओसरतोय. गत ...

Krishna, the destruction of the great flood near Koynak | कृष्णा, कोयनाकाठी महापुराचा विध्वंस

कृष्णा, कोयनाकाठी महापुराचा विध्वंस

Next

कऱ्हाड : पावसाचा जोर मंदावला, धरणातील विसर्गही कमी करण्यात आला. त्यामुळे कृष्णा आणि कोयना नद्यांचा महापूर आता ओसरतोय. गत दोन दिवसांपासून सुरू असणारी प्रत्येकाच्या जीवाची घालमेलही कमी होतेय; पण या महापुराचं विध्वंसक रूप आता समोर येऊ लागले आहे. गावोगावी पूल, रस्ते, घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाणी साचल्याने पिके कुजणार असून, रोगराईचा विळखा पडण्याची शक्यता आहे.

कऱ्हाडसह पाटण तालुक्यात निर्माण झालेले महापुराचे संकट आता दूर होण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्यांची पाणीपातळी कमी होत आहे. त्यातच कोयना धरणातून विसर्गही कमी करण्यात आल्यामुळे महापुराचे पाणी पुन्हा नदीपात्राकडे सरकू लागले आहे. कऱ्हाडातील दत्त चौक, पाटण कॉलनी, पायऱ्यांखालील भाग, कृष्णा घाट, कुंभार पाणंद, जोशी बोळ येथील नागरी वस्तीत शिरलेले पाणी कमी झाले आहे. या पाण्याखाली गेलेली बहुतांश घरेही शनिवारी रिकामी झाली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना अद्याप त्यांच्या मूळ घरी सोडण्यात आले नसले तरी रविवारी पूर पूर्णपणे ओसरल्यानंतर त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

तांबवे पुलासह अन्य पुलांवरील पाणीही ओसरले असून, वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. मात्र, महापुराच्या तडाख्यात या पुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुलांचे संरक्षक कठडे तुटले आहेत, संरक्षक जाळी मोडली आहे तर काही ठिकाणी पूल खचल्याच्या घटनाही घडल्या आहेत. नदीकाठची शेतजमीन खचली आहे. पाण्याखाली गेलेली पिके पुरासोबत वाहून गेली आहेत. तर काही शेतजमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे पिके कुजण्याची शक्यता आहे.

- चौकट

वांग नदीच्या पुरामुळे नुकसान

कुसूर : वांग नदीने रौद्ररूप धारण केल्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील आणे, येणके आणि अंबवडे विभागात मोठे नुकसान झाले. येथील पूल दोन दिवस पाण्याखाली होता. त्यामुळे पुलाचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्यानेही नुकसान झाले आहे. पोतले-येणके नवीन पुलाचीही पुरामुळे पडझड झाली आहे.

- चौकट

पोतले गावाचा विळखा सुटतोय

किरपे येथे कोयना नदीला मिळालेल्या वांग नदीने शुक्रवारी आणि शनिवारी रौद्ररूप धारण केले होते. पोतले ते येणके दरम्यानचा नवीन पूल पाण्याखाली गेला होता. पुराच्या पाण्यामुळे या पुलाचेही नुकसान झाले आहे. शनिवारपासून पाणी ओसरू लागले असून, जुने पोतले गावाला पडलेला पाण्याचा विळखा आता सुटू लागला आहे.

- चौकट

कार्वे विभागात शेती पाण्याखाली

कार्वे : कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे कार्वे परिसरातील नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, नदीकाठी भूस्खलनही झाले आहे. दोन दिवस कार्वे परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शिवार जलमय झाले होते. मुसळधार पावसाने भात, सोयाबीन, भुईमूग, पालेभाज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

- चौकट

दुशेरेत घरांचे मोठे नुकसान

वडगाव हवेली : मुसळधार पाऊस आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कृष्णा नदीला पूर आला. या पुराचे पाणी दुशेरे (ता. कऱ्हाड) गावातील अनेक घरांमध्ये घुसले. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही घरांना धोकाही निर्माण झाला आहे. तसेच दुशेरे गावातील पूल पाण्याखाली गेल्यामुळे दळणवळण ठप्प आहे.

- चौकट

टोळेवाडी मार्गावर दरड कोसळली

पाटण तालुक्यात सलग दोन दिवस जोरदार पाऊस पडला. या पावसात पाटण ते टोळेवाडी मार्गावर दरड कोसळली आहे. त्यामुळे टोळेवाडीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

फोटो : २४ केआरडी ०५

कॅप्शन : तांबवे (ता. कऱ्हाड) येथील कोयना नदीवरील नवीन पुलावर आलेले पुराचे पाणी ओसरले असून, पुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (छाया : दीपक पवार)

फोटो : २४ केआरडी ०६

कॅप्शन : कऱ्हाडातील शाहू चौकात असणाऱ्या हॉटेलमधील पुराचे पाणी ओसरल्यानंतर रविवारी व्यावसायिकांनी स्वच्छतेचे काम हाती घेतले.

Web Title: Krishna, the destruction of the great flood near Koynak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.