‘कृष्णा’, ‘कोयना’ धोकापातळीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:01 PM2019-08-04T23:01:05+5:302019-08-04T23:01:13+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरश: कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने अक्षरश: कहर केल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यातच आता जिल्ह्यातील बहुतांशी धरणांतून विसर्ग सुरू असून, कृष्णा आणि कोयना नद्यांतील पाण्याने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून पश्चिम भागात सतत हजेरी लावणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून अक्षरश: कहर केला असून, पश्चिम भागातील लोकांचा संपर्क तुटल्यातच जमा आहे. रस्त्यात झाडे पडणे, घाटात दरड कोसळणे, ओढे, नाले दुथडी भरून वाहने आणि वरून धो-धो पाऊस यामुळे लोकांना घराबाहेर पडणेही मुश्कील होऊन गेले आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाचा आणखी जोर वाढला आहे. सातारा शहराबरोबर पश्चिमेकडील कोयनानगर, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळा या भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नुकसानीच्या घटनांत वाढ झाली आहे.
या पावसामुळे ओढे, नाले भरून वाहत आहेत. तसेच धरणामध्येही पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला आहे. कोयना धरणात तर सध्या एक लाख क्युसेकहून अधिक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता धरणातील साठा ९६.७५ टीएमसीपर्यंत पोहोचला होता. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे ११ फुटांपर्यंत वर उचलण्यात आले. त्यामधून ६५ हजार ८१३ व पायथा वीजगृहातून २१०० असा ६७ हजार ९१३ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील इतर धरणांमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, तर कोयना आणि कृष्णा नद्यांची पाणीपातळी धोक्याकडे वाटचाल करू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेची सूचना केली आहे.
नदीची धोकापातळी अशी...
कृष्णा नदीची सातारा शहराजवळील संगम माहुली येथे धोका पातळी ६२६ मीटर आहे. रविवारी सकाळी ही पातळी ६१८ मीटरवर होती. तसेच कºहाडात ५६७ मीटरवर धोका पातळी असून, सध्या तेथील पाणी ५५९ मीटरवर आहे. कोयना नदीची धोका पातळी ५६५ मीटर असून सध्या पातळी ५६३ मीटर आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
शाळेची भिंत आठ दुचाकींवर पडली
कºहाड येथील लाहोटी कन्या शाळेची धोकादायक संरक्षक भिंत रविवारी मुसळधार पावसामुळे दुपारी कोसळली. यामध्ये तब्बल सात ते आठ दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.