कृष्णा-कोयनाकाठ यंदा पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:20+5:302021-01-02T04:54:20+5:30

पाटण : कोयना धरणामध्ये सरत्या वर्षात म्हणजेच २०२० मध्ये २०१९ च्या तुलनेत अडीच हजार मिलिमीटर एवढा कमी पाऊस झाला. ...

Krishna-Koynakath watery this year | कृष्णा-कोयनाकाठ यंदा पाणीदार

कृष्णा-कोयनाकाठ यंदा पाणीदार

Next

पाटण : कोयना धरणामध्ये सरत्या वर्षात म्हणजेच २०२० मध्ये २०१९ च्या तुलनेत अडीच हजार मिलिमीटर एवढा कमी पाऊस झाला. मात्र, तरीही २०२१ या नवीन वर्षाच्या प्रारंभी धरणात ८५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाने नवीन वर्षाची सुरुवात पाणीदार केल्याचे समाधानकारक चित्र आहे. मे महिन्याअखेर वीज निर्मिती आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाणीसाठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

कोयना धरण म्हणजेच ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ हे समीकरण सर्वांना ज्ञात आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यांचाही काही भाग दिवस-रात्र प्रकाशमान करण्याची मोलाची कामगिरी कोयना धरणातील पाणीसाठ्यामार्फत होते. देशाच्या जलक्रांतीत मैलाचा दगड ठरणारे कोयना धरण आणि त्यातील पाणीसाठा यावर वर्षभर सर्वांचीच नजर असते. कोयना धरण क्षेत्रात २०१९ च्या पावसाळ्यात प्रचंड पाऊस पडल्यामुळे या परिसरात पुराचे थैमान होते. धरणाच्या इतिहासात एवढा प्रचंड पाऊस कधीही पडला नव्हता. २०१९ मध्ये पावसाची रेकॉर्डब्रेक नोंद पर्जन्यमापकावर झाली. त्यावेळी कोयनात ७ हजार ३७२ मि.मी., नवजा ८ हजार ४१५ मि.मी. आणि महाबळेश्वरला ७ हजार ३३२ मि.मी. एवढा पाऊस पडला. गत वर्षभरात कोयना ४ हजार ५२१ मि.मी., नवजा ५ हजार २१४ मि.मी. आणि महाबळेश्वर ५ हजार २१७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षातील पाऊस पडण्याचा फरक पाहिला असता तो सरासरी २ हजार ५०० मिलिमीटर एवढा आहे.

२०१९ मध्ये वर्षाखेरीस धरणात ८६.८३ टीएमसी पाणीसाठा होता; तर यंदाही नवीन वर्षाच्या सुरुवातीस धरणात ८५.२७ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंतची धरणातील पाणीसाठ्याची चिंता नाहीशी झाली आहे. आगामी कालावधित वीज निर्मितीसाठी आणि सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे.

- चौकट

सद्यस्थितीत कोयना धरणातील पाणीसाठ्याचा आकडा पाहता, मे महिन्याअखेर वीज निर्मिती आणि सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध असल्याचे दिसते. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच सांगलीकडील पाणी मागणीही वाढणार आहे. मात्र, तरीही धरणातील पाणीसाठ्याची स्थिती मजबूत असल्यामुळे समाधानकारक स्थिती आहे.

- वैभव चौगुले

प्रभारी कार्यकारी अभियंता

कोयना सिंचन मंडळ

फोटो : ०१केआरडी०१

कॅप्शन : प्रतिकात्मक

Web Title: Krishna-Koynakath watery this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.