Satara News: कराडच्या कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाचं नामकरण होणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता

By प्रमोद सुकरे | Published: January 6, 2023 05:03 PM2023-01-06T17:03:01+5:302023-01-06T17:23:05+5:30

देशातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या यादीत कृष्णा विद्यापीठ देशात ७३ व्या स्थानावर, तर वैद्यकीय शिक्षण संस्था गटामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज देशात ४२ व्या स्थानावर आहे.

Krishna Medical University of Karad to be renamed, approved by Union Ministry of Education | Satara News: कराडच्या कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाचं नामकरण होणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता

Satara News: कराडच्या कृष्णा वैद्यकीय विद्यापीठाचं नामकरण होणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मान्यता

Next

प्रमोद सुकरे

कराड : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशातील एक महत्वाची शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी अर्थात कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे नामकरण ‘कृष्णा विश्व विद्यापीठ’ असे करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणाबरोबरच कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण, फाईन आर्टस्‌सह अन्य शैक्षणिक अभ्यासक्रम राबविण्याच्या उद्देशाने बदलण्यात आलेल्या या नामकरणास, भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली असल्याची माहिती, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

दिवंगत जयवंतराव भोसले यांनी  १९८४ साली कराड येथे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स’ संस्थेची स्थापना केली. आरोग्य विज्ञानात झपाट्याने होत जाणारे बदल लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने, भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २४ मे २००५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या शिक्षण संस्थेला ‘कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड युनिव्हर्सिटी’ म्हणजेच अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता मिळाली. 

कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात यशस्वी घोडदौड सुरू केली. सुमारे ५८ एकरच्या विस्तीर्ण जागेत वैद्यकीय शिक्षणासह नर्सिंग, दंतविज्ञान, फिजिओथेरपी, अलाईड सायन्स व फार्मसी अशा विद्याशाखा सुरु करत, विविध अभ्यासक्रम सुरु केले. या विद्यापीठात हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.

झपाट्याने बदलणारे शिक्षणक्षेत्र, वाढत्या शैक्षणिक गरजा आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाने विद्यापीठाचे नाव बदलून कृष्णा विश्व विद्यापीठ करण्याचा निर्णय घेतला असून, याठिकाणी आता कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रशिक्षण, फाईन आर्टस्‌सह अन्य शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्यानुसार आता कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायसेन्स डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी हे नाव बदलून ‘कृष्णा विश्व विद्यापीठ (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी)’ हे नवे नामकरण करण्यात आले असून, अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता कायम आहे.

कृष्णा विद्यापीठाला यापूर्वीच 'नॅक'चे 'ए प्लस' श्रेणीतील मानांकन आणि 'आयएसओ ९००१ : २०१५' मानांकन प्राप्त झाले आहे. भारत सरकारच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सन २०२२ साली देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांची श्रेणी जाहीर केली. यामध्ये देशातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या यादीत कृष्णा विद्यापीठ देशात ७३ व्या स्थानावर, तर वैद्यकीय शिक्षण संस्था गटामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज देशात ४२ व्या स्थानावर आहे.

Web Title: Krishna Medical University of Karad to be renamed, approved by Union Ministry of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.