वाईतील कृष्णा पूल लवकरच घेणार निरोप; नागरिक भावनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 03:15 PM2021-11-17T15:15:59+5:302021-11-17T15:20:01+5:30
घडीव दगड घाटाच्या संवर्धनाला वापरण्याची होतेय मागणी
वाई : नवीन प्रशस्त पूल तयार होत असल्यामुळे वाईकरांमध्ये आनंद असला तरी गेली अनेक वर्षे ज्यांनी वाईकरांना खंबीर साथ दिली, तोच कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल आता निरोप घेणार आहे. त्यामुळे वाईकरांचे मन हळवे होताना दिसत आहे. शेवटची आठवण म्हणून अनेक जण पुलावर उभे राहून फोटो काढत आहेत, काही जण सेल्फी विथ पूल करत आहेत तर काही जण शेवटचं पुलावरून पायी चालत जातं आहेत. पुलाच्या निघणाऱ्या घडीव दगडी कृष्णा नदीवरील घाट संवर्धनला वापरावे, अशी ही मागणी जोर धरत आहे तसेच सोशल मीडियावर ही अनेक भावुक प्रतिक्रिया देत आहेत.
वाई शहराच्या उत्तर- दक्षिण भागास जोडणारा मुख्य पुल म्हणून ज्याची ओळख आहे, असा किसनवीर या मुख्य चौकास जाडणारा ब्रिटिशकालीन पूल आहे. गेली १३५ वर्षे ज्याने अनेक महाप्रचंड पूर झेलत वाईकरांची सेवा केली. स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी, अनेक हिंदी, मराठी चित्रपटाचे चित्रीकरणाचा साक्षीदार अनेक संकटातही न डगमगता वाईच्या दोन्ही भागाचा दुवा बनून खंबीरपणे कृष्णा नदीत आपले मजबूत पाय रोवून उभा राहिला व आपल्या कणखर पाठीवर आनंदाने ओझं वाहत राहिला.
वाई शहरामध्ये कृष्णा नदीवर बांधण्यात आलेला पूल हा १८८४ साली ब्रिटिशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला १३५ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानतंर १९८४ साली ब्रिटिश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्याबाबतीत पत्र पाठविण्यात आले होते. या पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे उगवली होती. गेली अनेक वर्षे एक नवीन सक्षम पुलाची मागणी केली जात होती. दोन्ही भागांना जोडणारा सक्षम पर्याय नसल्याने व नागरिकांच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नवीन पुलाचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता. पुलाचे शहराच्या दृष्टीने महत्व ओळखून शासनाने पुलाला मंजुरी देऊन नवीन तंत्रज्ञानाने युक्त १५ कोटीचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर केला.
वाई शहरास सक्षम पुलांची गरज
वाई शहर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असून प्रसिध्द पर्यटन स्थळ असल्याने या ब्रिटिशकालिन पुलावर रहदारी मोठ्या प्रमाणावर होती महागणपती मंदिरासमोर बांधण्यात आलेला नवीन पुलाची उंची कमी असल्याने पूरपरिस्थितीत या पुलाचा काहीच उपयोग होत नव्हता. सध्याचा धोका व भविष्यातील गरज लक्षात घेऊन ब्रिटिशकालीन पुलाच्या जागी एक नवीन सक्षम पुलाची गरज आहे.
- अनिल सावंत - नगराध्यक्ष वाई नगरपालिका प्रतिक्रिया
सांस्कृतिक, ऐतिहासिक वाई शहराच्या वैभवात भर टाकणारा व शेकडो शेकडो घटनांचा साक्षीदार शतकवीर पूल सेवानिवृत्ती घेतोय, ही घटना सर्वांच्या मनाला चटका लावणारी आहे. पण भविष्याची गरज पाहता नवीन पुलाची गरज आहेच, त्यामुळे आनंद ही होत आहे. या पुलाच्या घडीव दगडी कृष्णा नदीवरील घाट दुरुस्तीला वापरावे, यामुळे पूल स्मरणात राहील.
- धनंजय मलटणे -सामाजिक कार्यकर्ते वाई