कृष्णा, उरमोडीचे पात्र पडले कोरडे; धरणातील पाणी चोरल्याचा आरोप; ‘स्वाभिमानी’चा सिंचन मंडळात ठिय्या
By नितीन काळेल | Published: October 30, 2023 06:56 PM2023-10-30T18:56:57+5:302023-10-30T18:58:16+5:30
अधिकाऱ्यांना जाब; गोंधळ वाढल्याने पोलिसांची मध्यस्थी
सातारा : सातारा तालुक्यात कृष्णा आणि उरमोडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. मोटारी उघड्या पडल्या आहेत. पिकांना पाणी पुरणार नाही. तर दुसरीकडे धरणांतील पाण्याची चोरी झाली आहे, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सिंचन भवनात अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या मांडला. यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांना शांत केले.
याबाबत माहिती अशी की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साताऱ्यातील सातारा सिंचन मंडळात उरमोडी आणि कृष्णा नदी तसेच कण्हेर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पाण्यासंदर्भात आंदोलन केले. सोमवारी दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. उरमोडी तसेच इतर धरणांतून पाण्याची चोरी झाली आहे. धरणातील पाण्यामुळे दुष्काळी भागातील तलाव भरुन वाहत आहेत. त्यामुळे धरणात कमी पाणीसाठा राहिला आहे.
सातारा तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा आणि उरमोडी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातील विद्युत मोटारी उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिकांना पाणी कमी पडत आहे. कमी पाऊस झाल्यानेही धरणात कमी पाणीसाठा आहे. या पाण्याची सतत चोरी होत राहिल्यास लाभधारक शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्यामुळे पिकांसाठी घेतलेले कर्ज तसेच इतर कर्जेही भागवता येणार नाहीत. अशाने शेतकऱ्यांसमोर मोठे आऱ्थिक संकट उभे राहणार आहे, असे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. तसेच धरणातील पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना जाब विचारत ठिय्या मांडला. यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले. तसेच यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. मात्र, पोलिसांना मध्यस्थी करत आंदोलनकर्त्यांना शांत केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात अर्जूनभाऊ साळुंखे, रमेश पिसाळ, महादेव डोंगरे, संजय साळुंखे, बापू ढाणे, सुधाकर शितोळे, राजू घाडगे, नितीन घाडगे, तुकाराम शेडगे, चंद्रहार माने, धनाजी घाडगे, हणमंत शेडगे आदी सहभागी झाले होते.
आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाण्यासाठी सिंचन भवनात आॅक्टोबर महिन्यातच दोनवेळा आंदोलन केले आहे. यापूर्वी ९ आॅक्टोबरला आंदोलन झाले होते. मात्र, सोमवरच्या आंदोलनावेळी सिंचन मंडळात वरिष्ठ अधिकारी कोणीच नव्हते. त्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केली. तसेच धरणातील पाण्यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनकर्ते सिंचन भवनातून बाहेर पडले.