‘कृष्णा’ची प्रतिदिन १२०० मेट्रिक टन गाळप क्षमता करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:46 AM2021-09-24T04:46:29+5:302021-09-24T04:46:29+5:30

कऱ्हाड : ‘कृष्णा कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत आणि अधिक चांगल्या क्षमतेने व्हावे, यासाठी कारखान्याचे आधुनिकीकरण करून, कारखान्याची ...

Krishna will have a crushing capacity of 1200 metric tons per day | ‘कृष्णा’ची प्रतिदिन १२०० मेट्रिक टन गाळप क्षमता करणार

‘कृष्णा’ची प्रतिदिन १२०० मेट्रिक टन गाळप क्षमता करणार

Next

कऱ्हाड : ‘कृष्णा कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत आणि अधिक चांगल्या क्षमतेने व्हावे, यासाठी कारखान्याचे आधुनिकीकरण करून, कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता १२००० मे. टन करण्याचा निर्णय कृष्णा कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. तसेच कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पाची क्षमता १६ मेट्रिक वॅटवरून ४८ मे. वॅटपर्यंत वाढविण्याचा आणि डिस्टिलरी प्रकल्पाची क्षमता ९५ केएलपीडीवरून ३०० केएलपीडीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे प्रतिपादन अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.

रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६५ वी ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी डाॅ. भोसले बोलत होते. सभेला कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडिराम जाधव, दत्तात्रय देसाई, वसंतराव शिंदे, श्रीरंग देसाई, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी आदींसह मान्यवर व सभासद शेतकरी उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, ‘१९६०-६१ मध्ये कारखान्याचा पहिला गळीत हंगाम झाला. कारखान्याच्या मिल्स जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असल्याने व यंत्रसामग्रीची कार्यक्षमता कमी झाल्याने त्याचा उत्पादन क्षमतेवर व उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. शिवाय सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसक्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांच्या या उसाचे वेळेत गाळप होण्याची गरज लक्षात घेऊन, कारखान्याचे आधुनिकीकरण करत प्रतिदिन गाळप क्षमता १२००० मे. टन केली जाणार आहे. तसेच केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले जात असून, इथेनॉलची वाढती मागणी व त्याला मिळत असलेला चांगला दर पाहता, सध्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा निर्धार आमच्या संचालक मंडळाने घेतला आहे.’

यावेळी विषयपत्रिकेतील विविध विषयांचे वाचन करून ते एकमताने मंजूर करण्यात आले. कारखान्याच्या सध्याच्या भागाची (शेअर्स) दर्शनी किंमत १०,००० रुपयांवरून १५,००० रुपये करण्याचा ठरावही यावेळी मंजूर करून, त्याप्रमाणे कारखान्याच्या पोटनियमामध्ये दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली.

चौकट

दिवाळीपूर्वी उर्वरित एफआरपी देणार...

२०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याची एफआरपी प्रतिटन ३००८ रुपये इतकी आहे. त्यापैकी आजअखेर प्रतिटन २८०० रुपये दिले असून, सभासदांच्या मागणीनुसार एफआरपीची उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्याची ग्वाही डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

फोटो ओळी :

रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत बोलताना अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले.

Web Title: Krishna will have a crushing capacity of 1200 metric tons per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.